आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ जैविक शेतीचे माहेरघर व्हावे; डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केली अपेक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जैविक शेतीला विदर्भामध्ये पूर्वीपासून स्थान आहे. या भागातील शेतीला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी जैविक शेतीकडे वळावे लागेल. तसेच विदर्भ जैविक शेतीचे माहेरघर व्हावे, अशी अपेक्षा परम महासंगणकाचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केली. 


डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. विद्यापीठाचे प्रती कुलपती, कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, राज्याचे माजी कृषी सचिव उमेशचंद्र सारंगी, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू व्यासपीठावर होते. 


आमच्या विद्यापीठांनी ग्रामीण विकासाचे ध्येय समोर ठेवले पाहिजे. त्याशिवाय अपेक्षित विकास साधताच येणार नाही. सध्याची खेड्यातील स्थिती फार चांगली नाही. त्याविषयी कृतीद्वारे उत्तरे शोधण्याची गरज आहे. युवा संशोधक, कृषी पदवीधारकांनी या बाबत मार्ग काढण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन डॉ. विजय भटकर यांनी केले. उमेशचंद्र सारंगी म्हणाले, कृषी व्यवसाय प्रमुख क्षेत्र म्हणून विकसीत होत आहे. या क्षेत्रास दर्जेदार मनुष्यबळाचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने देशात अनेक कृषी व्यवसाय व्यवस्थापन संस्था अस्तित्वात आल्या आहेत. या संस्थांमधून उत्तीर्ण होणारे बरेच व्यवस्थापन व्यवसायांनी रोजगारासाठी कृषी क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. त्याचा लाभ घ्यावा. प्रती कुलपती भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी अहवाल सादर करताना विविध विषयांना स्पर्श केला. या भागातील मुख्य पिकांवर किटकांचा होणारा प्रादुर्भाव झाला त्यावेळी विद्यापीठाच्या संशोधकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. नुकतेच बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचे पुनरुत्थान आणि भातावर हिरवे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव भविष्यातील उत्पादकतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. विदर्भाच्या काही भागामध्ये घडलेल्या किटकनाशक विषबाधेमुळे शेतमजूर व शेतकऱ्यांच्या मृत्युचे प्रकरण विद्यापीठासमोर आव्हान आहे. संकटावर मात करणे शक्य आहे. 


या मान्यवरांचीही समारंभाला उपस्थिती
विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. गोविंद भराड, डॉ. व्ही. एम. मायंदे, डॉ. मोतीलाल मदान, डॉ. शरद निंबाळकर, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार गाेपीकिशन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर, गोपी ठाकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. 


नॉलेज, कॉलेज व्हिलेज त्रिसूत्री 
नॉलेज, कॉलेज आणि व्हिलेज हे सूत्र मजबूत केल्यास ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल. संशोधकांची ती जबाबदारी स्वीकारावी. कृषी महाविद्यालयांना गावांशी जोडावे लागेल. देशामध्ये हरितक्रांती झाली परंतु ती पुरेशी नाही, अशी अवस्था झाली आहे. यातून तातडीने मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. भटकर म्हणाले. दीक्षांत समारंभप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. सर्वाधिक पदके तसेच उत्कृष्टतेचा पुरस्कार प्राप्त करताना टाळ्यांचा कडकडाट होत होता. सभागृह दणाणून गेले होते.संचालन माधवी मानकर यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...