आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेसाठीच्या श्रमदानाची लगबग आज संपणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- प्रसिद्ध सिने अभिनेते अामीर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेसाठी गेल्या दोन महिन्यांपासून गावा-गावांत सुरु असलेले श्रमदान उद्या, २२ मे रोजी उसंत घेणार आहे. यासोबतच मंगळवारच्या मध्यरात्रीला कुदळ, फावड्यांची लगबगही थांबणार आहे. 


जिल्ह्याच्या अकोला, तेल्हारा, बार्शीटाकळी व पातूर या चार तालुक्यांतील २२९ गावांनी या वर्षीच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. या सर्व गावांमध्ये धूमधडाक्यात शुभारंभ करण्यात आला होता. यापैकी बहुतेक गावांत एक मे या महाराष्ट्र दिनी महाश्रमदानही करण्यात आले. 


पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणाऱ्या या गावांमध्ये शेततळे, खोदतळे, ढाळीचे बांध, कोल्हापुरी बंधारे आदी कामांद्वारे जलयुक्त शिवारची कामे केली जात आहे. जे गाव अधिक जास्त प्रमाणात ही कामे करेल, अशा गावांना वॉटर कप फाऊंडेशनतर्फे पुरस्कृत केले जाणार आहे. त्यासाठीची स्पर्धा उद्या २२ मेच्या मध्यरात्री संपुष्टात येत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी अनेक गावांमध्ये पुन्हा एकदा महाश्रमदानाचा बेत आखण्यात आला आहे. विशेष असे की ही कामे करण्यासाठी शासकीय यंत्रणेशिवाय भारतीय जैन संघटनेनेही (बीजेएस) मोठी मदत केली असून पोकलेन व जेसीबीची मदत पुरवली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये हुरूप आला असून अनेकांनी श्रमदानात सहभाग घेतला आहे. 


प्रत्येक तालुक्यातील १० गावांमध्ये उत्साह 
स्पर्धेत सहभागी झालेल्या चारही तालुक्यातील निवडक दहा गावांमध्ये प्रचंड जोश आहे. त्यानिमित्ताने उद्या, मंगळवारी सकाळी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. जेवढे जास्त खोदकाम होईल, स्पर्धेतील प्रतिसाद तेवढाच वाढणार असून त्यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. 


मोठा जल संचय शक्य 
वॉटर कप स्पर्धेत सहभागी बहुतेक सर्वच गावांमध्ये चांगले काम झाले असून त्यामुळे मोठा जल संचय शक्य झाला आहे. चारही तालुक्यातील किमान ५० गावांनी विशेष तयारी केली आहे. या तयारीची महती पुरस्कार वितरण समारंभानंतर कळणार आहे. 
- नरेंद्र काकड, जिल्हा समन्वयक, वॉटर कप फाउंडेशन. 

बातम्या आणखी आहेत...