आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्य विकासासंदर्भात राज्यात १६ पासून शिबिरे -उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- लघु उद्योगांच्या वाढीला प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण असून त्या अनुषंगाने कौशल्य विकास विषयक शिबिरांचे १६ जून पासून राज्यात आयोजन करण्यात येत आहे. पुण्यापासून उपक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी केले. 


अकोला इंडस्ट्रीज असो. च्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, महापौर विजय अग्रवाल, अकोला इंडस्ट्रीज असो. चे अध्यक्ष कैलास खंडेलवाल, उपाध्यक्ष उन्मेष मालू, अरुण मित्तल, कमलेश अग्रवाल, मनोज खंडेलवाल व्यासपीठावर होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 


अकोला येथे एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन कांबळे यांनी दिले. अकोल्यातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न करु, तसेच सीएफटीआरआय म्हैसूर पीकेव्हीमध्ये सामंजस्य करार झाल्यास प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल. उद्योगांना देण्यात येणाऱ्या पाण्याचे बिल वापराइतके द्यावे ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊ असे ते म्हणाले. अकोल्यात फूड पार्क झाल्यास या भागासाठी उपयुक्त ठरेल तसेच ग्रोथ सेंटर प्रभावी करायची आहेत, असेही त्यांनी सांगितले. 


शिक्षणाची दिशा उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने ठरवण्याची गरज निर्माण झाल्याचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले. उद्योग आणि शिक्षण यांच्यामध्ये समन्वय राहणे पुढच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. केवळ पदव्या देऊन उपयोगाचे नाही तर समाजाची गरज पूर्ण करणारे शिक्षण देतो का, याचाही विचार गरजेचा आहे. एका पाहणीनुसार बीई झालेल्या ३३ टक्के मुलांना रोजगार मिळतो. ६७ टक्के विद्यार्थी बेरोजगार राहतात ही चिंतेची बाब आहे. अमरावतीमध्ये टेक्स्टाइल पार्कला उपयोगी होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने ११ अभ्यासक्रम सुरू केले. एक महिना क्लासरुममध्ये शिक्षण तर दोन महिने प्रात्यक्षिकावर भर आहे. यामुळे रोजगार निर्माण झाला आहे. 


महापौर विजय अग्रवाल म्हणाले, शिवनी-शिवर रस्त्यावरील अतिक्रमण हटवू त्यामुळे खुल्यावरील मांस विक्रीला आळा बसू शकेल. अकोल्यातील रस्ते विकासासाठी नितीन गडकरी यांनी ५०० कोटी रुपयांची तरतूद करुन दिली आहे. अमृत योजनेद्वारे शहराला पाणी देऊ शकतो. तसेच येत्या दोन वर्षात शहराचा पाणीप्रश्न सोडवण्याची ग्वाही अग्रवाल यांनी दिली. कैलास खंडेलवाल यांनी स्वागतपर भाषणात एमआयडीसीमध्ये पाण्याची कायमस्वरुपी योजना व्हावी, प्रादेशिक कार्यालय तातडीने व्हावे, कुंभारी तलाव एमआयडीसीने ताब्यात घ्यावा. तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून म्हैसांग जवळच्या मुंगशी बॅरेजमधील पाणी एमआयडीसीला मिळण्याची व्यवस्था व्हावी आदी विषयांकडे उद्योग विकास आयुक्तांचे लक्ष वेधले. पाण्याच्या वापरानुसार बिल, लेबर सेसचा प्रश्न सुटावा अशी मागणी केली. संचालन सचिव नितीन बियाणी यांनी केले. 


अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण : 
असोसिएशनच्या कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. एमआयडीसीमध्ये २३ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्या उपक्रमाची सुरुवात आजपासून झाल्याचे नमूद करुन झाडांचे संवर्धन व्हावे त्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी सदस्यांनी केली. 


बुलेटिनचे प्रकाशन, मान्यवरांचा सत्कार 
असो. च्या बुलेटिन-२०१८ चे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. असो. चे संस्थापक भीमराव धोत्रे, डीआयसीचे महाव्यवस्थापक नीलेश निकम, द्वारकादास चांडक, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राहुल बन्सोड, सीए कुशल साबद्रा, प्रदीप नंद, नितीन बियाणी, रॅलीजचे अधिकारी, पोलिस हवालदार अमोल मोरे, राजेंद्र बोदडे, एक्स्पोचे संयोजक श्रीकांत पडगीलवार, संजय शर्मा, निखिल अग्रवाल, किरीट मंत्री, नरेश बियाणी, अमित सराफ, शैलेश पाटील, संजय बिलाला, केतन अग्रवाल, कृष्णा खटोड, राहुल मित्तल, मनोज खंडेलवाल यांचा पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह, रोप भेट देऊन सत्कार करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...