आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅबिनमध्येच घेतली 20 हजारांची लाच; उपअधीक्षक जाधव जाळ्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- शेत जमिनीमधील शिल्लक १९ गुंठे जमिनीचे मुख्य मालकांकडे हस्तांतरण करण्याच्या अहवालातील त्रुटीची पूर्तता करून तो अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यासाठी २० हजार रुपयाची लाच स्वीकारताना खामगाव येथील भूमि अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक वंदन जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज ४ मे रोजी दुपारच्या सुमारास उपअधीक्षक यांच्या कॅबिनमध्ये करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


खामगाव शहरातील तक्रारदार यांची पालिकेच्या हद्दीत शेत सर्वे नंबर ७/१ मधील शेत जमिनीतील १९ गुंठे जमिनीचे मुख्य मालकाकडे हस्तांतरण करण्याच्या अहवालातील त्रुटीची पूर्तता करून तो अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्याची मागणी तक्रारदार यांनी येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक वंदन विठ्ठल जाधव यांच्याकडे केली होती. परंतु यासाठी वंदन जाधव यांनी तक्रारदाराकडे वीस हजार रुपयाची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी काल ३ मे रोजी बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. दरम्यान आज ४ मे रोजी या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचला. यावेळी लाचखोर उप अधीक्षक वंदन जाधव यांना आपल्याच कॅबिनमध्ये तक्रारदाराकडून वीस हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी वृत्त लिहिपर्यत एसीबीची आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलिस उपअधीक्षक शैलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस.बी. भाईक, संजय शेळके, सुनील राऊत, विजय वारुळे, समीर शेख व मधुकर रगड यांनी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...