आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळीच्या नुकसानाचे ५४.१० कोटी पोहोचले; जिल्हाधिकारी आज ठरवणार तालुकानिहाय मदतीचे वितरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- बोंडअळीची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी ५४.१० कोटींची रक्कम प्रशासनाकडे पोहोचली. या रकमेचे तालुकानिहाय वितरण सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर केले जाईल. विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचलेली ही रक्कम दुसऱ्या टप्प्याची असून ३६.१४ कोटींचा पहिला टप्पा यापूर्वी प्राप्त झाला होता. 

 

गतवर्षी बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांचे नुकसान झाले होते. त्यापैकी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अनुदानासाठी १ लाख ३३ हजार ६६८ शेतकरी पात्र ठरले होते. त्यांच्या १ लाख ४६ हजार ४८० हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकावर बोंड अळीने हल्ला केला होता. शासनाच्या अनुदान सूत्रानुसार या शेतकऱ्यांसाठी १३५ कोटी ५१ लाख ७४ हजार ३३९ रुपयांची रक्कम हवी होती. परंतु ती एकावेळी देणे शक्य नसल्याने समान तीन हप्त्यात (४५.१७ कोटी) देण्याचे शासनाने मान्य केले होते. यापैकी पहिल्या हप्त्यात ३६ कोटी १४ लाख पाठवले होते. दरम्यान दुसऱ्या टप्प्याचीही रक्कम मिळाली असून फवारणी, डवरणी, निंदन अशा शेती कामांसाठी ही रक्कम कामी येतील. या रकमेचे अर्थसंकल्पीय वितरण (बीडीएस) शनिवारीच विभागवार केले. तसे पत्र विभागीय आयुक्तांना पाठवले असून त्यांच्यामार्फत ते जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्याकडे पाठवले जात आहे. त्यानंतर बाधित क्षेत्राची व्याप्ती केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकारी याचे तालुकानिहाय वितरण करतील. ती रक्कम तहसीलदारांपर्यंत जाणार असून, त्यांच्यामार्फत बँकांना लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या पाठवणार आहे. 


ती रक्कम मिळाली 
पहिल्या टप्प्यात दिलेली अनुदानाची रक्कम ही त्या हप्त्याच्या ८० टक्क्याएवढीच होती. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याची रक्कम देताना शासनाने त्या टप्प्यातील उर्वरित २० टक्के रक्कमही दिली. त्यामुळेच जिल्ह्यात ४५ कोटी १७ लाखां ऐवजी ५४ कोटी १० लाख दिले. 


आज ठरणार वितरण 
शासनाने दिलेल्या दुसऱ्या टप्प्याच्या रकमेचे तालुकानिहाय वितरण सोमवारी ठरवणार आहे. ज्या तालुक्याचे जेवढे क्षेत्र बाधित झाले, त्या प्रमाणात त्या तालुक्याला वाटा देणार आहे. त्यामुळे कोणत्या तालुक्याला किती रक्कम मिळणार हेही उद्याच स्पष्ट हाेईल.

बातम्या आणखी आहेत...