आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ८६ मि. मी. जास्त पाऊस ; कुठे लाभदायक; तर कुठे खरडली जमीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवारी रात्री व सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पाऊस काही ठिकाणी पिकांसाठी लाभदायक तर, काही ठिकाणी मात्र नुकसानदायक ठरला अाहे. अनेक ठिकाणचे शेत रस्ते खचले असून, शेतात कसे जायचे असा, प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत अाहे. पाऊस अातापर्यंत अपेक्षेच्या तुलनेने ८६ मि.मी. जास्त झाला अाहे. बहुतांश ठिकाणी रखडलेल्या पेरण्यांना अाता वेग येणार अाहे. 


यंदा १ जून राेजीच पावसाने दमदार एंट्री केली. शहरात तर वादळी वाऱ्यांसह काेसळलेल्या पावसाने जुने शहरात प्रचंड नुकसान केले हाेते. त्यानंतर एका अाठवड्याने ग्रामीण भागात पाऊस झाला. अनेक ठिकाणी पेरणीही झाली. मात्र नंतर वरूण राजाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पेरणी अाेटाेपलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले. दरम्यान, गत दाेन दिवसांपासून पावसाने पुन्हा बरसण्यास प्रारंभ केला. काही ठिकाणी रविवारी रात्री व काही ठिकाणी, तर कुठे सोमवारी पहाटेपासून पावसाला प्रारंभ झाला. 


येथे झाली अतिवृष्टी
पातूर तालुक्यात बाभुळगाव मंडळात अतिवृष्टी झाली असून, या मंडळात गत २४ तासात १४६ मि.मी. पाऊस झाल्याची नाेंद केली अाहे. आलेगाव, चान्नी मंडळातही सरासरी ८० मि.मी. पावसाची नोंद केली असून, पावसाने बेलुरा बु. येथील पुलाचे प्रचंड नुकसान झाले असून, गावांचा संपर्कही तुटला. दमदार पावसामुळे बाळापूर तालुक्यातील पारस ते बाेराळा रस्त्यावरील पूल क्षतिग्रस्त झाला असून, या पुलाच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी अनेकदा प्रशासनाला साकडेही घालण्यात अाले हाेते. देवगाव मानकी परिसरातील शेत रस्ते खचले अाहेत. पावसामुळे पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, जमीनही खरडून गेली अाहे. 


पूर्णा नदीची पातळी वाढली
दाेन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे पश्चिम वऱ्हाडातून वाहणाऱ्या पूर्णा नदीचा जलस्तर वाढला अाहे. परिणामी या नदीच्या सर्व उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत. शेगावजवळील मन नदीला पूर आला. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अकाेल्याजवळ भाैरद-डाबकीतील छाेट्या नदीवरून काही वेळ पाणी वाहिले. नंतर पाण्याच्या पातळीत घट झाली. त्यामुळे गायगावकडून शहराकडे येणारी वाहतूक मंदावली हाेती. दमदार पावसामुळे पुलावर खड्डे पडले असून गायगावकडे जाताना डाव्या बाजूला पुलाचा छोटासा भाग खचला अाहे. 


अशी झाली पावसाची नाेंद 
जिल्ह्यात साेमवारी सरासरी २६.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात अाली. जिल्ह्यात अातापर्यंत सरासरी २८९ मि.मी. पाऊस पडला असून, १ जून ते ९ जुलै या दरम्यान सरासरी २०३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित हाेते. ही टक्केवारी ४१.४५ एवढी अाहे. 


अशी झाली पेरणी
जिल्ह्यात अातापर्यंत ६३ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली असून, सर्वाधिक ३७६.९ मि.मी. पाऊस बार्शीटाकळी तालुक्यात पडला असून, पेरणीही ७२ टक्के झाली अाहे. अकाेट तालुक्यात ५९ % पेरणी झाली असून, तेल्हारा-४० %, बाळापूर-६६ %, पातूर-६० %, अकाेला- ६७ % आणि बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुक्यात प्रत्येकी ७२ % पेरणी झाल्याची नाेंद कृषी विभागात अाहे. मात्र यापेक्षा जास्त पेरणी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे अाहे. 


काही तालुक्यात वरूणराजाची कृपा 
>जिल्ह्यात तेल्हारा : अाडसूळ, िहवरखेड, अडगाव, दानापूर, तळेगाव, बेलखेडला पाऊस झाला. अकाेट : अासेगाव बाजार, सावरा, अकाेला जहांगिर, उमरा, मुंडगाव, दहीहंडात पावसाने हजेरी लावली. अकाेला व मूर्तिजापुरातही पावसाने हजेरी लावली. 
>बाळापूर : वाडेगाव, खिरपुरी, पारस, हातरूण, गायगावसह डाबकी, भाैरद परिसरात वरूण राजा बरसला. बाळापूर तालुक्यातील भिकुंड, मन नदीच्या पात्रात पाणी वाढले असून, धरणाच्या पातळीही वाढ झाली. नागझरी येथील पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याने अकाेला- शेगाव मार्गावरील वाहतूक बंद झाली हाेती. 
>जिल्ह्यात सोमवारी बाळापूर व पातूर तालुक्यात पाऊस झाला. काही ठिकाणी नुकसानही झाले. याची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, बाळापूर तालुका कृषी अधिकारी जांभरुणकर यांनी पाहणी केली. 

 

आठवड्यानंतर बार्शीटाकळीत पाऊस 
तालुक्यात एका आठवड्यानंतर पावसाचे आगमन झाले. रविवार, ८ जुलैला तालुक्यात एकूण ११८ मिमी पावसाची नोंद आहे. परिसरात पेरणी आटोपली अाहे. गुरुवार ५ जुलैपासून परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. ७ जुलैला २४ तासात धाबा सर्कलमध्ये १७ मिमी, बार्शिटाकळी सर्कलमध्ये २९ मिमी, पिंजर सर्कलमध्ये २५ मिमी, राजंदा सर्कलमध्ये १० मिमी, खेर्डा भागाई सर्कलमध्ये ३५ मिमी अशा प्रकारे एकूण १४१ मिमी पावसाची नोंद तहसील कार्यालयात झाली आहे. 

 

पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित 
बोरगावमंजू परिसरात गतवर्षाच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, दमदार पावसाच्या हजेरीनेे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नापिकीने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढले. मात्र, यंदा पावसाच्या दमदार एंट्रीनेे परिसरातील पेरण्या आटोपल्या असून, डवरणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने त्वरित पीक विमा काढून पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी शेतकरी बांधवांना केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...