आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील तीन अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- न्यायालयाच्या आदेशान्वये २० जुलैला महापालिका प्रशासनाने शहरातील तीन धार्मिक स्थळांवर कारवाई केली. ही कारवाई पहाटे पाच वाजता करण्यात आली. दरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तर चौथ्या धार्मिक स्थळावर रणपिसे नगर भागातील नागरिकांनी स्थगिती आणली होती. या स्थगितीमुळे ही कारवाई झाली नसली तरी स्टे हटवून ही कारवाई २१ जुलैला होण्याची शक्यता आहे. 


न्यायालयाने २००९ नंतर बांधलेली आणि रहदारीत अडथळा ठरलेली धार्मिक स्थळे हटवण्याचे आदेश दिले होते. २०१४-२०१५ या काळात एकूण ५१ अनधिकृत धार्मिक स्थळे निश्चित करण्यात आली. यापैकी तीन स्थळे वगळण्यात आली होती. तर ४४ धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली होती. या नंतर ती थांबवण्यात आली. मात्र न्यायालयाने २१ जुलैला अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल मागितल्याने राहिलेली चार धार्मिक स्थळे हटवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. यात गोरक्षण मार्गावरील कोठारी वाटिका क्रमांक ४, कौलखेड परिसरातील खेतान नगर, याच भागातील उन्नती नगर आणि रणपिसे नगर भागातील एक धार्मिक स्थळ असा चार धार्मिक स्थळाचा समावेश होता. यापैकी खेतान नगर, कोठारी वाटिका, उन्नती नगर येथील धार्मिक स्थळे हटवण्यात आली. तर रणपिसे नगर भागातील धार्मिक स्थळावर न्यायालयाने स्टे दिला आहे. त्यामुळे तेथे कारवाई करण्यात आली नाही. ही कारवाई २१ जुलैला न्यायालयातून स्टे काढल्यानंतर त्याच दिवशी करण्यात येण्याची शक्यता आहे. या मोहिमेत आयुक्त अजय लहाने, उपायुक्त अनिल बिडवे, साहाय्यक आयुक्त डॉ.दीपाली भोसले, पूजा कळंबे, विजय ईखार, संदीप गावंडे, वासुदेव वाघाळकर, राजेंद्र टापरे, राजेंद्र घनबहादूर, मधुकर कांबळे, विवेक कुटे, विजय बडोणे, प्रवीण मिश्रा, तेजराव बन्सोड, बाबाराव शिरसाट, राजू धामोडे, काशिक पटेल, मनोज घाटोळे, नीलेश वाघमारे आदींनी केली. 


पुन्हा एकदा सर्वेक्षण
शहरात पुन्हा एकदा रहदारीत अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. लवकरच हे सर्वेक्षण पूर्ण करून तसा अहवाल तयार केला जाणार असून त्यानंतर कारवाई केली जाईल. 


न्यायालयाच्या निर्णयाचा घेतल्या जातो आधार
मागील दोन वर्षांपासून अकोला शहरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नावाखाली सातत्याने हिंदूंची मंदिरे पाडण्यात येत अाहेत. याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष देण्याची मागणी आमदार गाेवर्धन शर्मा यांनी केली आहे. 


चोख बंदोबस्त 
कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर नागरिकांना मूर्ती काढण्यापूर्वी पूजा-अर्चनाही करु देण्यात आली. यामुळे ही कारवाई शांततेत पार पडली. 

बातम्या आणखी आहेत...