आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या चार व्यावसायिकांवर केली कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- बंदी आदेशाला झुगारून शहरातील काही व्यावसायिक सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे पालिकेच्या पथकाला आढळून आले आहे. यावेळी पथकाने शहरातील चार व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याप्रकरणी प्रत्येकी पाच हजार रुपयाचा दंड, असा एकूण वीस हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे. ही धडक कारवाई आज २७ जून रोजी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


सहा दिवसापूर्वी पर्यावरणास घातक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर शासनाने बंदी घातली आहे. परंतु या बंदी आदेशाला झुगारून शहरातील काही व्यावसायिक सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. दरम्यान प्लास्टिक पिशव्या बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी उपमुख्याधिकारी श्रीपाद देशपांडे यांच्या नेतृत्वात एक पथक गठीत करण्यात आले आहे. तत्पूर्वी प्लास्टिक पिशवी बंदी संदर्भात व्यावसायिकांना थोडा वेळ देवून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत दंडात्मक कारवाई टाळावी, असे निवेदन काल मंगळवारी शहरातील किराणा असोसिएशनने पालिका प्रशासनाला दिले होते. त्यावेळी मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु आश्वासन देवून चोविस तास उलटत नाही तोच, पालिकेच्या पथकाने आज पासून कडक कारवाईला सुरुवात केली आहे. यावेळी पथकाने शहरातील सुरेखा प्रोव्हीजन, पारस ट्रेडिंग, जैन महिला गृह उद्योग व संचेती गारमेंट्स या प्रतिष्ठानांवर धाड टाकून त्यांच्याकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्या प्रकरणी प्रथम गुन्हा म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण वीस हजार रुपये दंड वसूल केला आहे. 
या कारवाईमध्ये उपमुख्याधिकारी श्रीपाद देशपांडे, स्वप्निल लघाने, राहुल मापारी, एकनाथ गाेरे, राजेश भालेराव, अंकिता टिकार, सुनील बेंडवाल, प्रमोद सुस्ते, शाम श्रीवास, शिवराम बेंडवाल व कांतीलाल बेंडवाल यांनी सहभाग घेतला होता. पथकाने शहरातील चार व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याप्रकरणी प्रत्येकी पाच हजार रुपयाचा दंड केला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...