आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: मान्सून व मान्सूनपूर्व पावसामुळे 688 घरे, 294 हेक्टर फळपिकांचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जून महिन्याच्या पहिल्या आणि पाचव्या दिवशी झालेल्या मान्सूनपूर्व तसेच ८ जूननंतरच्या वादळी मान्सूनमुळे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना फटका बसला. अकोला, बाळापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यात ६८८ घरांची पडझड झाली तर अकोला तालुक्यातील सोमठाण्यात एक गोठा भुईसपाट झाला.


या पडझडीमुळे १३ गावांच्या ६२५ कुटुंबांतील अडीच हजार नागरिक बाधित झाले असून २९४ हेक्टरमधील फळ पिकांचेही नुकसान झाले आहेत. बाधित झालेल्या नागरिकांपैकी पाच जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन छोटी जनावरे मृत झाली असून या सर्व आपत्तीचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने शासनाकडे पाठवला आहे.

 

या अहवालानुसार पहिल्याच पावसात अकोला तालुक्याचे सर्वाधिक नुकसान झाले. तालुक्यातील चांदूर या एकट्या गावातील २६८ घरांवरील टिनाचे छत उडून गेले. याच तालुक्यातील शिवणी येथील ७२, आगरची १४, सोमठाण्याची ५, हिंगण्याची (म्हैसपूर) ४ आणि पाळोदीची ३ घरेही पडली. त्यामुळे तेथील रहिवासी तात्पुरते बेघर झाले असून त्यांच्यापुढे निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतरच्या पावसानेही या तालुक्याला मोठा हादरा दिला असून ३०३ घरांची पडझड झाली आहे.


अशाप्रकारे अकोला तालुक्यात एकूण ५७१ कच्ची घरे बाधित झाली. यासोबतच बाळापूर तालुक्यातही रिधोरा आणि इतर गावांच्या ८९ घरांना फटका बसला. तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनी पाहणीअंती नुकसानाची प्राथमिक नोंद केली अाहे. या नोंदीनुसार प्रत्यक्ष नुकसानाची आर्थिक मोजदादही सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार पंचनाम्यांतील तथ्यावर आधारित मदतीचे वाटपही काही तालुक्यात सुरु झाले आहे.
सोमठाणा गावातील गुरांचा एक गोठाही पहिल्या पावसात जमीनदोस्त झाला. हा गोठा पडल्यामुळे एक म्हैस जखमी झाली असून तिचा पाय निकामी झाला आहे. तिकडे बाळापुर तालुक्यातील रिधोरा येथील तीन घरांनाही शुक्रवारच्या वादळी पावसाने आपल्या कवेत घेतले. त्यामुळे तेथील नागरिकदेखील तात्पुरते बेघर झाले असून जिल्हाभरातील विस्थापितांसाठी आवश्यक तेथे पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

 

२९४ हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान
१९ जूनला झालेल्या मान्सूनच्या पावसामुळे केळीसह जिल्ह्यातील २९४ हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये हिवरखेडच्या ७२, खंडाळाच्या ६२, कार्लाच्या ४५, मालठाणा खुर्दच्या ३०, तळेगाव खुर्दच्या १८, मोराडीच्या ११, चितलवाडीच्या ९, हिंगणी खुर्द, गोर्धा, चिचारी व सदरपूरच्या प्रत्येकी ७, कऱ्ही अडगावच्या ५, हयातपूर व बेलखेडच्या प्रत्येकी ४ आणि तळेगाव बुजुर्ग व सोनवाडीच्या प्रत्येकी ३ हेक्टरचा समावेश आहे.

 

झालेले नुकसान दृष्टीक्षेपात
२५०० व्यक्ती बाधित, ६८८ घरांची पडझड, ६२५ कुटुंबांना फटका, २९४ हे.मधील फळपीक खराब, १७ शिवारात फळपिके नुकसान, १३ गावांमध्ये घरांची पडझड, ५ व्यक्ती किरकोळ जखमी, ३ लहान जनावरे मृत, १ गोठा भुईसपाट, म्हैस जखमी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

 

पावसाचा लपंडाव, पेरणी पाच टक्के
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस झाला असला तरी अकोट व तेल्हारा हे दोन तालुके माघारले आहेत. दरम्यान पेरणीसाठी हव्या असलेल्या पावसाचा रोजचा लपंडाव सुरु आहे. कधी मध्येच ढग जमा होऊन अतिवृष्टीसारखे वातावरण तयार होते. तर कधी आकाश निरभ्र होऊन चक्क उन्हं पडते. त्यामुळे शेतकरी मान्सूनची वाट बघत असून पेरणीची टक्केवारी पाचवरच थांबली आहे.

 

सरकारी कार्यालयांनाही फटका
वादळी पावसामुळे जिल्ह्यातील सरकारी व निमसरकारी कार्यालयांच्या इमारतींनाही फटका बसला. काही ठिकाणी शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या छतावरील टिनपत्रे उडून गेली. शहरापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या सांगवी-मोहाडी येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या टिनाचे छप्पर उडाले. त्याचवेळी महावितरणचे अनेक खांब वाकले असून ताराही तुटल्या. या नुकसानाचा आकडा अद्याप प्रशासनाला प्राप्त व्हायचा आहे.


पुढे काय होणार ?
पूर परिस्थितीचे दिवस सुरु झाल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जास्त पावसामुळे उद्भवणारी पूरस्थिती आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी जिल्ह्याच्या शोध व बचाव पथकाला मोर्णा नदीच्या पात्रात प्राथमिक धडे देण्यात आले आहे. पूर परिस्थितीशी दोन हात करण्यासाठीची 'मॉक ड्रील'ही झाली आहे. या अनुभवाचा फायदा प्रत्यक्ष मदत कार्याचे वेळी होणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...