आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवाढीविरुद्ध हजारो अकोलेकरांचा एल्गार, स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कोणत्याही लढ्याला लोकसहभाग महत्वाचा असतो. ही बाब पुन्हा एकदा गुरुवारी काँग्रेसने करवाढी विरोधी राबवलेल्या स्वाक्षरी अभियानातून सिद्ध झाली आहे. महापालिका कार्यालयासमोर झालेल्या या अभियानात बाया-बापडे, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक आदी हजारोंनी केवळ स्वाक्षऱ्याच केल्या नाहीत तर या निमित्ताने 'टॅक्स वाढल्याने उत्पन्न कमी असणारी व्यक्ती टॅक्स भरु शकत नाही, मी टॅक्स भरणार नाही', 'सेव्ह अकोला फ्रॉम दिज पिपल', 'लूटमार टॅक्स रद्द करून जनतेची सेवा करा', अशा शब्दात आपल्या भावनाही व्यक्त केल्या.परिणामी करवाढ विरोधी आंदोलनाला आता जनाधाराची झालर लागल्याने आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

महापालिकेने उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने मालमत्ता करात प्रचंड प्रमाणात वाढ केली. मालमत्ता करवाढीमुळे चारही बाजूचा आर्थिक बोझा हा सर्व सामान्य नागरिकांनाच बसला. रुग्णालये, खासगी शाळा, मंगल कार्यालये आदींचा कर मोठ्या प्रमाणात वाढल्याने या कराचा भरणाही नागरिकांच्या खिशातून काढणे सुरू आहे. या प्रकारामुळे सर्व सामान्य नागरिक वेठीस धरला गेला आहे. दैनिक दिव्य मराठीने या अनुषंगाने एप्रिल २०१७ पासून करवाढीचा विषय सातत्याने लावून धरला. यातून विविध राजकीय पक्षांचे आंदोलने सुरु झाली. आंदोलनाला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन सत्ताधारी गटाने अखेर वाढवलेल्या मालमत्ता करात १८.५२ टक्के कपात केली. दरम्यान, या कपाती नंतर मात्र विरोधकांनी फारसा हल्लाबोल केला नाही. परंतु आता पुन्हा करवाढ आंदोलनाने उचल खाल्ली आहे. मागील महिन्यात काँग्रेसच्या नगरसेवकांनी विशेष सभा बोलावण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबवले तर माजी महापौर मदन भरगड यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. तसेच विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण, डॉ.जिशान हुसेन, शिवसेनेचे राजेश मिश्रा, मंगेश काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी गटावर हल्लाबोल करीत आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे करवाढ विरोधी वातावरण पुन्हा तापले. दरम्यान मदन भरगड यांनी जाहीर केल्या प्रमाणे ८ फेब्रुवारी रोजी मनपासमोर करवाढ विरोधी स्वाक्षरी अभियानात गांधी मार्गावरुन जाणाऱ्या येणाऱ्या हजारो नागरिकांनी आपली वाहने थांबवून सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...