आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला- खंडवा ब्रॉड गेज रेल्वे ठरणार पूरक; संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातून धावू शकते रेल्वे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- अकोला -खंडवा या प्रस्तावित ब्रॉड गेज रेल्वे मार्गासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन संस्थेच्या उच्च स्तरीय समितीने सुचविल्याप्रमाणे अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील अकोट, हिवरखेड ,संग्रामपूर, जळगाव जामोद या तालुक्यातून जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात यावी, अशी मागणी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यपालांकडे केली आहे. या रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन संस्थेच्या एका उच्च स्तरीय समितीने मेळघाट मधून जाणाऱ्या या रेल्वे मार्गास विरोध दर्शविला असून रेल्वे प्रकल्पासाठी पर्यायी मार्ग सुचविलेला आहे. पर्यायी मार्ग हा अकोट, अडगाव बु, हिवरखेड, सोनाळा, टुनकी, जामोद, कुंवरदेव या अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील भागातून जाणार आहे. त्यामुळे सुमारे ११० गावे जोडली जाणार असून अडीच लाख लोकसंख्येस त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार असल्याचे आमदार सपकाळ यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले आहे. 


अकोला -खंडवा या रेल्वे मार्गाचे मीटर गेज मधून ब्रॉड गेज मध्ये रूपांतरण करण्याच्या प्रकल्पास भारत सरकारने मान्यता दिलेली आहे. १७६ किलोमीटर लांबीचा हा मार्ग ३९ किलो मीटर अंतरापर्यंत मेळघाट व्याघ्र संरक्षण प्रकल्पामधून जाणार आहे. २,७०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला मेळघाट या व्याघ्र संरक्षण प्रकल्पात अमरावती, अकोला व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील वनक्षेत्र समाविष्ट आहे. मेळघाट हा महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकांचा तर देशातील तिसऱ्या क्रमांकांचा व्याघ्र संरक्षण प्रकल्प आहे. आजमितीस या परिसरात ५० वाघ व अनेक वन्यश्वापदांचे अस्तित्व आहे. या परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा सुध्दा आहे. आज पर्यंत या व्याघ्र संरक्षण प्रकल्पासाठी अब्जावधी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. एवढेच नव्हे तर वाघांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या परिसरातील अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मेळघाट मधील ज्या क्षेत्रातून हा रेल्वेमार्ग जाणार आहे, तो प्रदेश वाघांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या मार्गाने वन क्षेत्रातील केवळ ९ गावे जोडल्या जाणार असून फक्त ६,९५० लोकसंख्येस त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे. या नऊ ही गावांमध्ये शेतजमिनीचे व उत्पादनाचे प्रमाण फारच कमी आहे. तसेच वन क्षेत्रातून जाणार असल्यामुळे या मार्गाचा या परिसरातील औद्योगिक विकासासाठी फारसा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट आहे. तसेच या परिसरात रेल्वे मार्गामुळे रोजगारांच्या सुध्दा अत्यल्प संधी उपलब्घ होणार आहेत. सोबतच पर्यावरणाची व पर्यटन क्षेत्राची फार मोठी हानी होणार असल्याची वस्तुस्थिती आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली आहे. 


व्यापक मानवी हिताकडे डोळेझाक 
राज्य शासनाचा वन विभाग मेळघाटमधून प्रस्‍तावित मार्गाबाबत प्रतिकूल असतांनासुध्दा १८ जून रोजी दिल्ली येथील परिवहन भवनामधील बैठकीत याच मार्गाने हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे समजते. हा निर्णय दुर्दैवी असून पर्यावरण व मानव हितास छेद देणारा असल्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. पर्यायी रेल्वे मार्गामुळे केवळ ३० किमी. लांबीची वाढ होणार असून, प्रकल्पाचा खर्च वाढत असल्याचे कारण देत केंद्रशासन पर्यावरणासह मानवी हिताबाबत डोळेझाक करीत असल्याचा आरोप आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे

बातम्या आणखी आहेत...