आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच दिव्यांग, महिलांना दिलासा देणाऱ्या अंदाज पत्रकाला 'स्थायी'ची मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिका अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच दिव्यांग आणि महिलांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुद करण्यात आलेल्या अंदाज पत्रकाला स्थायी समितीने बदलांसह मंजुरी दिली. आयुक्त जितेंद्र वाघ यांनी २०१८-२०१९ चे १७ कोटी १९ लाख शिलकीचे अंदाज पत्रक स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांच्याकडे सादर केले. चर्चे दरम्यान सदस्यांनी खर्चाच्या तरतुदीवरच अधिक भर दिला. अंदाज पत्रकाचा ताळमेळ जुळवण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्न वाढीवर अत्यल्प उपाय योजना सुचवल्या. स्थायी समितीच्या मंजुरी नंतर आता अंतिम मंजुरीसाठी अंदाज पत्रक महासभेसमोर सादर केले जाणार आहे. 


आयुक्त जितेंद्र वाघ यांनी २२३ कोटी ९५ लाख उत्पन्नाचे आणि २१२ कोटी ९८ लाख रुपयाच्या खर्चाचे अंदाज पत्रक स्थायी समितीसमोर सादर केले. अंदाज पत्रकावर चर्चा करताना भारिप-बमसंच्या गटनेत्या अॅड.धनश्री अभ्यंकर-देव यांनी हद्दवाढीच्या भागासाठी अंदाज पत्रकात तरतुद केली नाही या भागात कोणतेही विकास कामे झालेली नाहीत. त्यामुळे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या प्रत्येक प्रभागासाठी एक कोटी रुपयाची तरतुद करावी, फॉगींग मशिनसाठी २० लाख रुपयाची तरतुद केली असली तरी प्रत्यक्षात फॉगींग मशिन फवारणी करताना कुठेच दिसत नसल्याचा आरोप केला. तर कॉग्रेसचे महंमद इरफान म्हणाले, महापालिकेने मालमत्ता करातून ९० कोटी रुपये अपेक्षित उत्पन्न दर्शवले आहे. मात्र करवाढी बाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून काही नागरिक, संघटना न्यायालयात गेल्या आहेत तर काही पक्ष आंदोलन करीत आहे. यामुळे ९० कोटी रुपयाचा कर वसुल कसा होईल? असा प्रश्न उपस्थित करुन योग्य कर आकारणी केल्यास नागरिक कराचा भरणा अधिक प्रमाणात करतील,त्यामुळे वाढवलेले दर कमी करावेत, अशी मागणी करतानाच विशेष पाणीपट्टी वसुलीतून १५ कोटीचे उत्पन्न प्रशासनाला अपेक्षित आहे. मात्र तुर्तास नळांना मीटर न लावणाऱ्या नळधारकाला महिन्याकाठी ३०० रुपयाचे देयक आकारले जात आहे. तर दुसरीकडे आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा होतो. ही बाब लक्षात घ्यावी, असे नमुद केले. भाजपचे सुनील क्षीरसागर म्हणाले, सार्वजनिक स्वच्छतागृह निर्मिती आणि दुरुस्तीसाठी केवळ ३० लाख रुपयाची तरतुद केली आहे. ती ५० लाख करावी तसेच नगरसेवकांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपयाचा निधीची केलेली तरतुद वाढवून १५ लाख रुपये करावी. ग्राम पंचायत मधून महापालिकेत समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यल्प आहे. ते सुद्धा आता महापालिकेचे कर्मचारी झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ करावी, अशी मागणी केली. कॉग्रेसच्या शाहिन अंजुम म्हणाल्या, शाळा दुरुस्तीसाठी ३० लाख रुपयाची तरतूद केली आहे. त्यात वाढ करावी तसेच ज्या शाळांचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे, त्या शाळांचे काम त्वरित सुरु करावे. भाजपच्या पल्लवी मोरे यांनी वृक्षारोपणासाठी २५ लाखांची केलेली तरतूद ५० लाख रुपये करावी अशी मागणी केली. सुजाता अहिर यांनी स्थायी समिती सदस्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी अतिरिक्त दहा लाखांची तरतूद करावी, अशी मागणी केली. उषा विरक यांनी महिला व दिव्यांगासाठी विशेष निधीची तरतूद केल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले. सदस्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली. 

 

उत्पन्न वाढीवर नगण्य उपाय योजना 
अंदाज पत्रकात सदस्यांनी केवळ खर्चावर अधिक तरतूद केली. मात्र अंदाज पत्रकाचा ताळमेळ साधताना खर्च व उत्पन्न या दोन्ही बाजू लक्षात घ्याव्या लागतात. नगरसचिव अनिल बिडवे यांनी उत्पन्न वाढीबाबतही सदस्यांनी उपाय योजना सूचवाव्यात, असे आवाहन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा विरक यांनी अस्वच्छता राखणाऱ्या हॉटेल्स, मंगल कार्यालये, लॉन आदींवर दंडात्मक कारवाई करावी, खुल्या भूखंडावरील करात वाढ करावी. भाजपचे अनिल गरड यांनी पार्कींग झोन वाढवावेत, भाजपचे सुनील क्षीरसागर यांनी गुंठवारी विकास नियमानुकुल सुरु करावीत तर सुजाता अहिर यांनी अवैध मोबाईल टॉवरवर कारवाई करावी आदी उपाय सूचवले. 

 

मनपा स्थापना दिनी जन्मणाऱ्या मुलींसाठी पाच हजार रुपये द्या 
मनपाचा स्थापना दिवस १ ऑक्टोबर आहे. त्यामुळे १ ऑक्टोंबर रोजी जन्म घेणाऱ्या मुलीच्या नावे तिच्या खात्यात पाच हजार रुपये टाकण्यात यावे तसेच ज्या मालमत्ता महिलांच्या नावे आहेत, त्या मालमत्तांवर कर आकारणी करु नये, अशी मागणी भारिप-बमसंच्या अॅड. धनश्री अभ्यंकर-देव यांनी केली. 

 

दिव्यांगांसाठी शहर वाहतूक बससेवेत सवलत 
प्रशासनाने सादर केलेल्या या अंदाज पत्रकात दिव्यांग व महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग्यासाठी शहर वाहतूक बस सेवेत सवलत, व्यवसाय, साहित्य खरेदीसाठी अनुदान, उत्पन्नाच्या अटीवर घरकुलासाठी अर्थ सहाय्य, स्टॉल उभारण्याकरीता, विवाहासाठी अर्थ सहाय्य यासाठी २ कोटी रुपयाची तरतूद या अंदाज पत्रकात करण्यात आली आहे. तर महिला व बालकल्याण योजनांसाठी शिलाई मशिन वाटप, ८ ते १२वीच्या मुलींना सायकल , विधवा, घटस्फोटितांना घरकुल, उच्च शिक्षणाकरीता मुलींना अर्थसहाय्यासाठी ३ कोटी २५ लाखंाची तरतूद करण्यात आली. 

 

दिव्यांगांसाठी शहर वाहतूक बससेवेत सवलत 
प्रशासनाने सादर केलेल्या या अंदाज पत्रकात दिव्यांग व महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग्यासाठी शहर वाहतूक बस सेवेत सवलत, व्यवसाय, साहित्य खरेदीसाठी अनुदान, उत्पन्नाच्या अटीवर घरकुलासाठी अर्थ सहाय्य, स्टॉल उभारण्याकरीता, विवाहासाठी अर्थ सहाय्य यासाठी २ कोटी रुपयाची तरतूद या अंदाज पत्रकात करण्यात आली आहे. तर महिला व बालकल्याण योजनांसाठी शिलाई मशिन वाटप, ८ ते १२वीच्या मुलींना सायकल , विधवा, घटस्फोटितांना घरकुल, उच्च शिक्षणाकरीता मुलींना अर्थसहाय्यासाठी ३ कोटी २५ लाखंाची तरतूद करण्यात आली. 

 

औषधी, उपकरणांसाठी महापालिकेने प्रथमच केली १५ लाखांची तरतूद 
महापालिका प्रशासनाने एकीकडे दिव्यांग व महिलांसाठी कोट्यवधी रुपयाची तरतूद केली असताना दुसरीकडे शिक्षण व आरोग्य विभागासाठीही भरीव रक्कमेची तजवीज केली आहे. आता पर्यंत या दोन्ही विभागासाठी फारशी तरतूद करण्यात आली नव्हती. शिक्षण विभागासाठी गणवेश, बॅन्ड साहित्य, आसन पट्ट्या, डेस्क-बेंच, पुस्तके, फर्निचर आदींसाठी ८० लाख तर गणवेश आणि पाठ्यपुस्तकांच्या खरेदीसाठी प्रत्येकी दहा लाख रुपयाची तरतूद केली आहे. आरोग्य विभागासाठी औषधे व उपकरणे खरेदीसाठी प्रथमच १५ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...