आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठराविक जातीलाच टार्गेट करता का? या वक्तव्यावरून महासभेचा झाला आखाडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- एमआयएमच्या नगरसेवकाने एका जातीलाच टार्गेट करता काय? असा प्रश्न उपस्थित केल्याने १२ जुलै रोजी झालेल्या महासभेला काही मिनिटे आखाड्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. या प्रकारामुळे महापौरांनी १५ मिनिटे महासभा तहकूब केली. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला. यानंतर विविध पक्षाच्या नगरसेवकांनी दिलगिरीही व्यक्त केली. मात्र, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच जातीचा उल्लेख झाल्याने सभागृहातील वातावरण संतप्त झाले होते. 


महापालिकेची महासभा विविध कारणांनी सतत गाजते. कधी दहा मिनिटात ३२ विषय मंजूर करणे, कधी विरोधकांना असमान निधीचे वाटप यासह विविध कारणांनी सभेत तोडफोड, जोरात ओरडणे आदी प्रकार घडतात. त्यामुळे सभेत गदारोळ ही बाब अकोलेकरांसाठी नवी नाही. मात्र, १२ जुलैची सभा वेगळ्याच कारणांनी गाजली. शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी गुलजार पुरा येथील हिंदू स्मशान (दफन) भूमीच्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा सभेत उपस्थित केला. अतिक्रमण काढले जात नसेल तर दफन भूमीसाठी दुसरी जागा द्या, अशी मागणी केली. त्यानंतर राजेश मिश्रा यांच्यासह विविध सदस्यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. 


या दोन्ही प्रस्तावाच्या वेळी विरोध करण्यात आला. मात्र, त्यावेळी वातावरण तापले नव्हते. दरम्यान, भाजपचे नगरसेवक अनिल गरड यांनी शिक्षणाधिकारी पदच रद्द करा, अशी मागणी केली. यावर एमआयएमचे महंमद मुस्तफा यांनी जोरदार आक्षेप घेत, एकाच जातीला टार्गेट करता का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर शिवसेनेचे शशिकांत चोपडे संतप्त झाले. तुम्ही असे कसे म्हणू शकता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावरून शशिकांत चोपडे आणि महंमद मुस्तफा यांच्यात जोरदार वादावादी झाली. 


एवढेच नव्हे तर एकमेकांना पाहून घेण्याची भाषाही व्यक्त केली. या सर्व प्रकारात बेंचही पडला. हा सर्व प्रकार पाहून महापौर विजय अग्रवाल यांनी खाली येऊन दोन्ही सदस्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 


तसेच सभा १५ मिनिटांसाठी तहकूब केली. या दरम्यान विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण, राजेश मिश्रा, राहुल देशमुख, पराग कांबळे, सतीश ढगे, सुनील क्षीरसागर आदी नगरसेवकांनी मध्यस्थी केल्याने वातावरण शमले. सभा सुरु झाल्या नंतर विविध नगरसेवकांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सभेचे कामकाज सुरु झाले. 


गैरसमजातून माझ्या तोंडून जातीचा शब्द निघाला 
एमआयएमचे नगरसेवक महंमद मुस्तफा म्हणाले, माझा गैरसमज झाला. त्या गैरसमजातून माझ्या तोंडून जातीचा शब्द निघाला. मात्र, झालेल्या प्रकाराबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण यांनी झालेल्या प्रकार योग्य नसून जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी सभागृहाची माफी मागतो, असे सांगून या विषयावर आता चर्चा नको, असे सुचवले. तर राजेश मिश्रा म्हणाले, मी कोणत्या जाती बद्दल बोललो नाही. मात्र, कुणाचे मन दुखावले असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. 


अधिकाऱ्यांची जात नव्हे त्यांचे कार्य महत्त्वाचे 
कामकाज सुरू झाल्यानंतर महापौर विजय अग्रवाल म्हणाले, आपण सर्व अनेक वर्षांपासून सभागृहात काम करतो. एखाद्या अधिकाऱ्यावर अथवा एखाद्या कामावर नाराजी होऊ शकते. पण त्याची रिअॅक्शन जाती-धर्मावर करणे चुकीची बाब आहे. सर्वच समाजाचे, धर्माचे नगरसेवक सभागृहात आहेत. काम करताना चुक होवू शकते. अधिकाऱ्याची जात महत्वाची नाही तर त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. जे काम करीत नसतील त्यांना बोलावेच लागेल. तसेच राजेश मिश्रा यांनी मांडलेला विषय जातीवादी नव्हता. परंतु यापुढे असा प्रकार घडू नये, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...