आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 'पीए'विरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हा परिषद अध्यक्षाचा लाचखोर स्वीय सहायक तथा वरिष्ठ सहायक अधिकारी चंद्रशेखर रायभान गवई याने एका शिक्षकाला २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, कारवाईची माहिती मिळताच तो फरार झाला. त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी शिक्षण विभागातील कमावीसदार याला सात हजारांची लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुसरी कारवाई केल्याने शिक्षण जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार या निमित्ताने समोर आला आहे. 


तेल्हारा तालुक्यातील एका शिक्षकावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रशासनाने या शिक्षकाला निलंबित केले होते. निलंबित कालावधी नियमित करणे, पगार थकबाकी काढणेसाठी व वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यासाठी सेटींग करून देतो. त्यासाठी २५ हजार रुपये लागतील, अशी मागणी चंद्रशेखर गवईने केली होती. गवई याच्याविरुद्ध तक्रारदार शिक्षकाने एसीबीमध्ये एप्रिल महिन्यात तक्रार दिली होती. त्यावरून एसीबीने २५ एप्रिल २०१८ रोजी पडताळणी केली होती. त्यात २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे पंचासमक्ष समोर आले होते. त्यानुसार गुरुवारी एसीबीने ही कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पोलिस निरीक्षक इश्वर चव्हाण, पोलिस हवालदार दामोदर, सुनिल राऊत, संतोष दहिहंडी, राहूल इंगळे व सुनिल येलोने यांनी केली. 


अध्यक्ष कुणीही असो पीए हाच!
झेडपीचा अध्यक्ष कुणीही असो चंद्रशेखर हाच अध्यक्षाचा स्वीय सहायक असतो. त्याला सर्व खाचखडगे माहित आहेत. 


कारवाईची कुणकुण लागताच आरोपी फरार 
एसीबीच्या कारवाईची माहिती आरोपी चंद्रशेखर गवई याला मिळाली. आपल्यावर केव्हाही कारवाई होऊ शकते, म्हणून तो फरार झाला. एसीबी त्याचा शोध घेत आहे. 

बातम्या आणखी आहेत...