आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सहकार'चा दणका: कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केलेल्या 58 सराफा सावकारांविरुद्ध गुन्हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सराफा सावकारांना ज्या कार्य क्षेत्रासाठी परवाना दिला आहे. त्या कार्यक्षेत्रातीलच शेतकऱ्यांना कर्ज देणे आवश्यक होते. मात्र सराफा सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना सोने चांदीच्या दागिन्यावर कर्ज दिले. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या निकष व अटीत बसत नसल्याने कर्जमाफी पासून वंचित राहत आहे.

 

म्हणून परवान्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सराफा सावकारांविरुद्ध उपनिबंधक सहकारी संस्थेने कारवाईचा बडगा उगारला असून, अशा ५८ सावकारांविरुद्ध कार्य क्षेत्राबाहेर कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली शनिवारी २३ जूनला शहर कोतवाली, रामदास पेठ, बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

 

नियमानुसार ठरवून दिलेल्या कार्य क्षेत्राच्या बाहेर सावकारी करणाऱ्या सावकारांविरुद्ध तालुका उपनिबंधक दीपक वामनराव शिरसाट यांनी विविध पोलिस ठाण्यांत शनिवारी तक्रारी दिल्या. त्यावरून शहर कोतवालीत गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार पोलिसांनी ईश्वरदास ॲन्ड सन्स, सराफा बाजार, मे. पसारी ज्वेलर्स, सुरभी ज्वेलर्सचे परमेशकुमार सुभाषचंद्र शहा, शहा ज्वेलर्सचे अविनाशकुमार नवलचंद शहा, बालकिसन बनवारीलाल अग्रवाल, दिलीप श्रावण भगत, अशोक मोतीराम वानखडे, मे. भिकमचंद सदाराम खंडेलवाल, कैलासचंद्र हिरालाल तातीया, गणेश एकनाथ पटवी, किशोर चिंतामण दंडगव्हाण, नंदकुमार ओंकारराव मुंडगावकर, अशोककुमार वनमाळीदास सोनी, निशांत नगीनदास सोनी, नारायणदास देवजी लोढीया, गिरीश शांतीराम लोढीया, नरेशकुमार रमनलाल शहा या सराफा सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दुसरी तक्रार तालुका निबंधक कार्यालयाचे मुख्य लिपिक श्रीराम सहारे यांनी दाखल केली, त्यानुसार मदन पांडुरंग भिरड, नितीन नरेंद्र तिखिले, विक्रम चंद्रकांत परमार, सतीश पुरुषोत्तम अग्रवाल, मुरलीधर गजानन वर्मा, रायकुमार रतीलाल शहा, शंकरलाल रामदेवजी अग्रवाल, विनयकुमार ओंकारराव मुंडगावकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

 

तिसरी तक्रार कनिष्ठ लिपिक प्रकाश सखाराम गवई यांनी दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून मनसुखलाल शहा, प्रमिला संतोषकुमार खंडेलवाल, रमेशकुमार मुन्नालाल भंडारी, कैलास बद्रीनारायण अग्रवाल, राजेंद्र विनयकुमार शहा यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. रामदासपेठ पोलिस ठाण्यात प्रमोद जनार्दन नकाशे, भारत बापूराव मेश्राम, महेंद्र देविदास डोंगरे, संजय जगन्नाथ वर्मा, अनिल ब्रिजलाल यादव, सुरेश पुंडलिकराव हिवराळे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

काय आहेत शासनाने दिलेले दिशानिर्देश
- ज्या परवानाधारक सावकारांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ४ चे उल्लंघन करून कार्य क्षेत्राबाहेर कर्जवाटप केलेले आहे. त्यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत.
- महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ४ अंतर्गत कोणताही सावकार, ज्या कार्य क्षेत्रासाठी त्याला अनुज्ञप्ती दिलेली असेल त्या क्षेत्राव्यतिरिक्त अन्यत्र आणि त्या अनुज्ञप्तीच्या अटी व शर्ती यांच्यानुसार असेल त्या व्यतिरिक्त अन्य रीतीने सावकारीचा धंदा करणार नाही, अशी तरतूद आहे.
- परवान्यात नमूद केलेल्या कार्यक्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी सावकारी परवाना दिलेला आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ४ चे कलम (ख) या तरतुदीचे उल्लंघन केल्यास कलम ४८ (क) नुसार दंडात्मक कार्यवाहीची तरतूद आहे.

 

आम्ही कुणाकडेही कर्ज द्यायला गेलो नाही : सराफा असोसिएशन
आमच्याविरुद्ध केलेली कारवाई कायद्यानुसार नाही. परवानाधारक सावकारांना त्यांच्या परवान्यामधील तरतुदीमधील नमूद केलेल्या कार्यक्षेत्रातील जागेवरूनच सावकारीचा व्यवसाय करता येतो. कार्यक्षेत्राची कायद्याप्रमाणे जी परिभाषा आहे, त्याप्रमाणे कार्य क्षेत्राबाहेरून सावकाराच्या दुकानावर येऊन कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला कर्ज देवू नये, अशी कोणतीही अट कायद्यामध्ये किंवा परवान्यामध्ये नाही. परंतु कार्यक्षेत्राच्या व्याख्येचा गैर अर्थ लावून, आमच्यावर कलम ४१ ख अन्वये गुन्हे दाखल केलेले आहेत. याविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू, असे अकोला सराफ असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजकुमार वर्मा , शहराध्यक्ष विजय वाखारकर, सचिव सुशील शाह यांनी म्हटले आहे.

 

सात दिवसांपूर्वी दिली होती नोटीस
उपनिबंधक सहकारी संस्था यांनी परवानाधारक सावकारांना मंगळवारी १२ जून पत्र पाठवले होते. त्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ४ चे कलम (क) या तरतुदीचे उल्लंघन केल्याचे नमूद नमूद केले होते. त्यानुसा कलम ११ अन्वये आपला सावकारी परवाना रद्द करण्याबाबत प्रस्तावित का करण्यात येऊ नये, असे म्हटले होते. त्याचा खुलासा सात दिवसांत सादर करण्याचेही म्हटले होते. त्यानंतर समाधानकारक उत्तर सावकारांकडून न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली.

 

२३ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्राबाहेरील सावकारांकडून कर्ज घेतल्याने ते कर्जमाफीत बसत नाही. कर्जमाफीचे निकष व अटींमध्ये हे शेतकरी बाद झाले असल्याने त्यांना शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहावे लागत आहे. जर परवानाधारक सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्ज दिले नसते तर शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती, त्यामुळे सरकारने कठोर भूमिका घेतली असून, राज्यभर कारवायांचा सपाटा सुरु केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...