आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा दिवसांमध्ये विभागीय आयुक्तांनी बदलला निर्णय; अपक्ष नगरसेवक डब्बूसेठ यांच्या अपात्रतेला स्थगिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अपक्ष नगरसेवक डब्बुसेठ यांना विभागीय आयुक्तांनी ६ जुलैला शिवसेनेच्या आघाडीत सामिल झाल्या प्रकरणी अपात्र घोषित केले होते. मात्र १६ जुलैला विभागीय आयुक्तांनीच या अपात्रतेला पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. परिणामी डब्बुसेठ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


राष्ट्रवादी कॉग्रेसने भारिप-बमसं, एमआयएमच्या नगरसेवकांना सोबत घेवून ९ सदस्यांची लोकशाही आघाडी स्थापन केली. यामुळे शिवसेनेचा स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग रोखला गेला. शिवसेनेने राष्ट्रवादी कॉग्रेसला शह देण्यासाठी त्यांचे आठ व अपक्ष नगरसेवक डब्बुसेठ अशी ९ सदस्यांची आघाडी स्थापन केली. दोन्ही गटाची संख्या ९ झाल्याने पाच पैकी चार स्वीकृत सदस्य निवडण्यात आले. मात्र एक जागा रिक्त ठेवण्यात आली. दरम्यान शिवसेनेच्या आघाडीला राष्ट्रवादी कॉग्रेसच्या गटनेत्या शीतल गायकवाड यांनी नागपूर न्यायालयात आव्हान दिले. नागपूर न्यायालयाने हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे वर्ग करुन चार महिन्याच्या आत निर्णय देण्याचे आदेश दिले. 


न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दोन्ही गटाच्या बाजू जाणून घेतल्या. मात्र पुढील सुनावणीच्या वेळी दोन्ही गटाचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाचा निकाल दिला. अपक्ष नगरसेवकाला कोणत्याही आघाडीत सामिल होता येत नसल्याने अपक्ष नगरसेवक डब्बुसेठ यांना विभागीय आयुक्तांनी ६ जुलैला निलंबित केले. या निर्णयाची प्रतही महापालिकेत धडकली. दरम्यान डब्बुसेठ विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देतील, अशी चर्चा होती. परंतु डब्बुसेठ यांनी न्यायालयात न जाता, विभागीय आयुक्तांकडे पुनर्विलोकन अपिल १६ जुलै रोजी दाखल केले. विभागीय आयुक्तांनी हे अपिल दाखल करुन घेत, ६ जुलै रोजी दिलेल्या स्वत:च्याच अपात्रतेच्या निर्णयाला पुढील निर्णया पर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे डब्बुसेठ यांच्यावरील अपात्रतेची कारवाई काही दिवसांपुरती टळली आहे.

 
गुरुवारी 'स्वीकृत'ची केली जाणार होती निवड 
दरम्यान डब्बुसेठ अपात्र झाल्याने स्वीकृत नगरसेवक निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. या आशयाचे वृत्त दिव्य मराठीने प्रकाशितही केले होते. डब्बुसेठ अपात्र झाल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीचे संख्याबळ ९ झाले. ही बाब लक्षात घेऊन महापौर विजय अग्रवाल यांनी १९ जुलै रोजी एका स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी सभाही बोलावली होती. परंतु आता अपात्रतेच्या प्रकरणाला स्थगिती मिळाल्याने गुरुवारी होणारी सभा रद्द करावी लागणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...