आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांच्या नियतकालीक बदल्या संदर्भात कोणतीही कार्यवाही करु नये : महापौर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अकोला म्युनिसिपल मजदूर युनियनने महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या करण्याची मागणी केली आहे. मात्र तूर्तास महापालिकेच्या प्रशासकीय सेवेत केवळ २०० ते २२५ कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यास बहुतांश विभाग विस्कळीत होतील, त्यामुळे आज रोजी बदल्या संदर्भात कोणतीही कार्यवाही करु नये, अशी सूचना महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला केली आहे. महापौरांच्या या आदेशामुळे मजदूर युनियनला मात्र जोरदार धक्का बसला आहे. 


अकोला म्युनिसिपल मजदूर युनियनने महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या संदर्भात राज्य शासनाच्या परिपत्रकाचा हवाला देत धोरण निश्चित करण्याची मागणी केली होती. या मागणीचे पत्र युनियनने महापौर विजय अग्रवाल यांनाही दिले होते. या पत्रा संदर्भात महापौर विजय अग्रवाल यांनी रोखठोक भूमिका घेतली. प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने शासन परिपत्रक महापालिकेला लागू होत नाही. तसेच महापालिकेमध्ये सेवेचे वर्गीकरण यापूर्वीच करण्यात आले असून यात तांत्रिक सेवा, लेखा सेवा, प्रशासकीय सेवा अशी विभागणी करण्यात आलेली आहे. तांत्रिक सेवेमध्ये वाहन चालक, फिटर, नर्स, वैद्यकीय अधिकारी आदी कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण केल्यास प्रशासकीय कामात खोळंबा येईल. तसेच पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग आदी विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असून अनेक कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार आहे. महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे बदल्या केल्यास विपरीत परिणाम होतील, त्यामुळे आज रोजी बदल्या संदर्भात कारवाई करु नये, अशी सुचना महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...