आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ जणांना 40 हजार दंड; प्लास्टिक पिशव्या जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - प्लास्टिक पिशवी बंदी विरुद्ध शहरात शिथिल केलेली कारवाई प्रशासनाला महागात पडली. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ही कॉन्फरन्स संपल्यानंतर उपायुक्त अनिल बिडवे यांनी आठ व्यावसायिक प्रतिष्ठानांवर प्लास्टिक बंदी विरुद्ध कारवाई केली. कारवाईत ४० हजारांचा दंड वसूल केला. ही मोहिम दररोज राबवणार आहे. कारवाईत व्यावसायकांनी उपायुक्तांशी हुज्जत घालून प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.

 

राज्य शासनाने प्लास्टिक पिशवी वापरावर, बाळगण्यावर बंदी घातल्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालय, मनपाने विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापे घालून दंड वसूल केला. प्लास्टिक पिशव्यांचा साठाही जप्त केला. मात्र दोन दिवसानंतर पर्यावरण मंत्र्यांनीच अर्धा किलो, एक किलोचे सामान न्यायला प्लास्टिक पिशव्यांची बंदी उठवल्याचे जाहीर केले. परिणामी प्लास्टिक पिशव्या विरुद्धकारवाई बंदच झाली. परिणामी ५० मायक्रॉनपेक्षा कमी दर्जाच्या पिशव्यांचा वापरही सुरु झाला. यामुळे प्लास्टिक बंदीला अर्थ राहिला नव्हता. शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरु असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना मिळाल्या नंतर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माहिती घेतली. या वेळी शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर कसा सुरु आहे, याची माहिती मिळाल्याने पर्यावरण मंत्र्यांनी संताप व्यक्त करुन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर प्रभारी उपायुक्त अनिल बिडवेंच्या पथकाने रतनलाल प्लॉट मधील जेजे एन अॅन्ड एक्स ब्रॅन्ड हाऊस, सुभाष चौकातील गोपाल ट्रेडर्स, गांधी मार्गावरील झी महासेल,टिळक रोडवरील जे. जे., छाया मेन्स वेअर, अशोक क्लॉथ सेंटर, सागर मेन्स वेअर, जुन्या कापड बाजारातील शु मॉल या प्रतिष्ठानांवर प्लास्टिक पिशव्या नॉन ओवन पॉलिप्रोपीलीन पिशव्या आढळल्याने दंडात्मक कारवाई केली. या व्यावसायिकाकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल केला. प्रतिष्ठानांतील प्लास्टिक पिशव्यांचा साठाही जप्त केला. या कारवाईत अब्दुल सलीम, संजय खोसे, शैलेश पवार, किरण खंडारे, प्रशिष भातकुले, मंगेश बांगर, प्रशांत जाधव, सुरज गणोजे, विनीत पांडे, मनोज भागवत, वीरेंद्र इलोंडे, निखिल कपले, महंमद अलिम, प्रवीण मिश्रा, विजय बडोणे, नरेश बोरकर,विनोद वानखडे, प्रकाश मनवर, राजेश पथरोट आदी सहभागी झाले होते. जनता भाजी बाजारासह अन्य भाजी बाजार, हातगाडीवर फळ विक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. याचे फोटोही काहींनी प्रशासनाला दिले आहेत. परंतु याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.


या अधिकाऱ्यांनी फिरवली कारवाईकडे पाठ : उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, सीईआे, बिडीआे,, आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, ग्राम सेवक, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, मोटर वाहन निरिक्षक, वाहतूक पोलिस, जिल्हा पुरवठा अधिकारी, राज्यकर अधिकारी, उपवन संरक्षक आदींनाही प्लास्टिक पिशवी विरोधात कारवाईचे अधिकार आहेत. मात्र या अधिकाऱ्यांनी या कारवाईकडे पाठ फिरवली आहे.

 

प्लास्टिक पिशव्या मोटर वाहन विभागात जमा करा : महापालिकेने सर्व व्यावसायिकांना ज्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे. त्या स्वत:जवळ न बाळगता तसेच त्याचा वापर न करता महापालिकेच्या खोलेश्वर भागातील मोटर वाहन विभागात जमा कराव्यात, असे आवाहन पुन्हा एकदा केले आहे.

 

पदाधिकाऱ्यांकडे कारवाई थांबवण्याची मागणी
गांधी मार्गावर झी महासेल मध्ये कारवाई करताना, झी महासेलच्या संचालकांनी उपायुक्त अनिल बिडवे यांच्याशी हुज्जत घालत, एकेरी भाषेचा वापर करीत अरेरावी केली. एवढेच नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांना शटर ओढून घ्या मग पाहू, अशी धमकी देखील दिली. एवढे होवूनही कारवाई होवू नये, यासाठी काही पदाधिकाऱ्यांना मोबाइल लावून कारवाई थांबवण्याची मागणी देखील केली.

 

आमिषही दाखवले : अखेर दंडात्मक कारवाई अटळ अाहे, ही बाब लक्षात आल्या नंतर पाच हजार रुपया ऐवजी चार हजार रुपये घ्या, वाटल्यास पावती देवू नका, असे आमिषही या महाशयांनी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दाखवले.

 

प्लास्टिक बंदीविषयी जिल्हा नियोजन भवनात कार्यशाळा
प्लास्टिक बंदी बाबत अनेकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या अनुषंगानेच प्लास्टिक बंदी बाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी १९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत प्लास्टिक बंदी बाबतचे अधिसूचनेतील तरतुदींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ नंदकुमार गांधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेला पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी, किरकोळ विक्रेते, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, महिला बचत गट आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...