आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरुग्णालयात अप्रशिक्षितांनी दिले मुलीला इलेक्ट्रिकचे शॉक, डॉक्टरांचा निष्काळजीपणा जीवावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सिव्हिल लाइन्सच्या हद्दीतील एका मनोरुग्णालयात १७ वर्षीय मुलीला भरती करण्यात आले होते. या मुलीला तेथील अप्रशिक्षित व कमी शिकलेल्या कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक शॉक दिले. त्यात मुलीची प्रकृती बिघडली, डॉक्टरांचा निष्काळजीपणा मुलीच्या जीवावर बेतला, असा गंभीर आरोप मुलीच्या आईने केला आहे. या प्रकरणी तिने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात मंगळवारी धाव घेत मानसोपचार तज्ज्ञांसह सहा जणांविरुद्ध तक्रार दिली. 


या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार राजनखेड येथील महिलेने सिव्हिल लाइन्स पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, तिच्या १७ वर्षीय मुलीला गत महिन्यात उलट्या व तापामध्ये ती बडबडत असल्याने स्थानिक लोकांच्या सल्ल्याने तिला मनोरुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला न तपासता जो डॉक्टर नाही त्यानेच तपासले. त्यानंतर समुपदेशनासाठी दुसऱ्याकडे पाठवले असता समुपदेशन सुरु असतानाच तेथील अनोळखी अप्रशिक्षितांनी मुलीला ईटीसी शॉक देण्याबाबत सुचवले. त्यानंतर डॉक्टरांनी मुलीला भरती करून घेतले व पाच शॉक द्यावे लागतील असे सांगून मुलीला नर्सिंगचा कोर्सही न केलेल्या व्यक्तीच्या ताब्यात सोपवून डॉक्टर नाशिकला निघून गेले. त्यानंतर मानसोपचारतज्ज्ञ उपस्थित नसताना मुलीला दोनदा शॉक दिले व तिला ओव्हरडोस औषधे देऊन दिवसभर बेशुद्ध ठेवले'. पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली आहे. 


मेंटल हेल्थ केअरनुसार रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन नसल्याचा तक्रारीत केला आरोप 
संबंधित मनोरुग्णालयाला मेंटल हेल्थ केअर कायदा, २०१७चे कलम ५५ व कलम ६६ अन्वये रजिस्ट्रेशन नसल्याने सदरचे रुग्णालय गैर कायदेशीर सुरु आहे. कलम ९४(३)नुसार सायक्रॅटीस्ट इटीसी शॉक हे उपचार म्हणून देता येत नाहीत. मुलीला शॉक दिल्याने तिचा मृत्यू होवू शकतो, हे माहित असताना तिला शॉक दिले, असा आरोप मुलीच्या आईने केला आहे. 


तक्रारीमध्ये गत महिन्यात रुग्ण दगावल्याचा उल्लेख 
चुकीच्या पद्धतीने अप्रशिक्षितांनी आनंद नामक मुलाला शॉक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही डॉक्टरवर करण्यात आला आहे. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची विनंतीही तक्रारीत करण्यात आली आहे.


तक्रारदार महिलेचे आक्षेप असे  
- डॉक्टरांनी स्वत: मुलीची तपासणी केली नाही 
- अप्रशिक्षितांनी शॉक ट्रिटमेंट केल्याने मुलगी दिवसभर बेशुद्ध होती. 
- अप्रशिक्षितांनी शॉक दिल्याचे व्हिडिओ असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. 
- डॉक्टरच सिझोफ्रेनिया आजाराचे रुग्ण आहे 


तक्रार घेतली आहे : वसंत मोरे, ठाणेदार सिव्हिल लाइन्स ठाणे 
संबंधित महिलेने आमच्याकडे तक्रार केली आहे. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप तक्रारीमध्ये आहे. तक्रारीतील तथ्य तपासून कायदेशीर कारवाई करू.

बातम्या आणखी आहेत...