आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिनिंग न झालेला कापूस, शेतातील कोषात गुलाबी बोंडअळ्यांचे पोषण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिनिंग न झालेला कापूस आणि शेत जमिनीत राहिलेल्या कोषाद्वारे गुलाबी बोंड अळ्यांचे पोषण होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फेरोमेन ट्रॅप्स तातडीने लावावेत. पिकाच्या वाढीनुसार लक्ष द्यावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी केले आहे. 


बार्शीटाकळी तालुक्याच्या जिनिंगमध्ये पतंग (मॉथ) दिसून आलेत. जिनिंग न झालेल्या कापसाची वेळीच विल्हेवाट लावली तर या प्रकाराला आळा बसू शकतो. कारण सध्या पिके ३० ते ३५ दिवसांची अाहेत. तसेच पात्या अथवा फुलांच्या अवस्थेत नसल्याने अंडी घालण्याचा प्रश्न नाही. तसेच सध्या ज्या बोंडअळ्या दिसताहेत त्यांची वाढ आत्मघातकी (सुसायडल पॉप्युलेशन) असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 


कपाशीचे पीक ४५ दिवसांचे झाल्यावर शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण त्यानंतर फुले, पात्यांची अवस्था सुरू होते. आणि अळ्यांना अंडी घालणे सोयीचे होते. त्यामुळे ५० व्या दिवशी फेरोमेन ट्रॅप्स लावा. ६० व्या दिवशी निंबोळी अर्काची फवारणी करा. या दरम्यान डोमकळ्या दिसून आल्यास त्या वेचून तातडीने नष्ट करावे. शेतकऱ्यांनी डोमकळ्याबाबत दुर्लक्ष करु नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. 


जिनिंग संचालकांची अनास्था 
यंदा गुलाबी बोंडअळ्यांच्या संकटापासून शेतकऱ्यांना वाचवण्याचा सर्वस्तरातून प्रयत्न केला जात आहे. परंतु जिनिंगमध्ये बोेंडअळ्यांचे पोषण होत असल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिनिंग संचालकांच्या प्रशिक्षणाबाबत कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभाग प्रमुखांना सांगितले होते. परंतु गेल्या आठवड्यात बोलावलेल्या बैठकीला बार्शीटाकळी वगळता एकाही तालुक्यातील जिनिंग प्रेसिंग संचालक उपस्थित नव्हते, ही बाब समोर आली आहे. 

 
विद्यापीठाची यंत्रणा सज्ज 
कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात या खरीप हंगामाच्यादृष्टीने फार पूर्वीपासूनच यंत्रणा सज्ज ठेवली आहे. विदर्भात समित्यांचे गठन केले आहे. फेरोमेन ट्रॅप (कामगंध सापळे) तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पाहणी करून पतंग कुठे दिसतात का, याची चाचपणी हाेत आहे.
 -डाॅ. धनराज उंदिरवाडे, कीटकशास्त्र विभागप्रमुख, डॉ. पंदेकृवि, अकोला. 

 

पावसाचा बोंडअळ‌्यांच्या वाढीवर परिणाम 
ज्या भागामध्ये दमदार पाऊस झाला तिथे पतंग दबलेत परंतु जिथे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला त्याठिकाणी पतंग डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबत पाहणी करण्यात येत आहे. मंगळवारी तेल्हारा व नजीकच्या भागाची पाहणी करण्यात आली. त्या भागातील पिके फुलावर, पात्यावर आलेली नसल्याने सध्या तरी अळ्यांनी अंडी घालण्याचा प्रश्न दिसत नाही. शेतकऱ्यांनी यंदा तातडीचा उपाय म्हणून कामगंध सापळे लावून अळ्यांचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक आहे.
- डॉ. अनिल कोल्हे, मुख्य पीक संरक्षण अधिकारी, डॉ. पंदेकृवि, अकोला. 

बातम्या आणखी आहेत...