आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची दडी; साडेचार लाख हेक्टरवरील पीक पेरणी धोक्यात, दुबार पेरणीचे संकट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- मागील आठ ते दहा दिवसापासून वरुणराजा रुसून बसल्यामुळे जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची झालेली पेरणी धोक्यात सापडली आहे. येत्या दोन तीन दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागणार आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाने दडी मारल्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. 


शासनाने दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी केली असली, तरी अद्याप जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना कर्ज माफी पासून वंचित राहावे लागले आहे. पीक विमा, बोंड अळीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. एवढेच नव्हे तर तूर व हरभऱ्याची हक्काची शंभर कोटी रुपयाची रक्कम पणन महासंघाकडे थकली आहे. त्यामुळे पेरणी कशाच्या भरवशावर करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. त्यातच जिल्ह्याच्या काही तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अनेक संकटाचा सामना करीत २६ जूनअखेर ४ लाख २७ हार १३९ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली आहे. 


आज ४ जुलै असल्यामुळे पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामध्ये चिखली, मेहकर व मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नव्वद टक्केच्यावर पेरणी केली आहे. तर पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे शेगाव १२ टक्के, जळगाव जामोद ३ टक्के व संग्रामपूर तालुक्यात १४ .४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. परंतु ही पेरणी होत नाही, तोच मागील दहा ते बारा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. दररोज उजाडणारा दिवस कोरडा जात असल्यामुळे नुकतेच जमिनीवर आलेले कोंब उन्हामुळे पिवळे पडू लागले आहे. पावसाअभावी जवळपास साडे चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी धोक्यात सापडली आहे. येत्या दोन तीन दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागणार आहे. घरात होते नव्हते ते विकून पहिली पेरणी कशीबशी केली. परंतु आता दुबार पेरणी कशाच्या भरवशावर करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पावसाचा परिणाम बाजार पेठेवर झाला असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात धोंडी धोंडी दे चा गजर घुमत आहे. तर पाण्यासाठी महिला देवीदेवतांना साकडे घालत आहेत. पाऊस लांबल्यामुळे शेतीची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर ठाण मांडून घरी बसला आहे. पावसाअभावी ग्रामीण भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 


तालुकानिहाय झालेल्या पेरण्या व त्याची टक्केवारी 
जिल्ह्यातील ७ लाख ४८ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी २६ जून अखेर ४ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लोणार ३४ हजार २५ हेक्टर ५६.८ टक्के, खामगाव ३६ हजार ५४० हेक्टर ५५.२ टक्के, शेगाव ५७ हेक्टर १२ टक्के, मलकापूर ३८ हजार ७६२ हेक्टर ९१.४ टक्के, मोताळा ४८ हजार ४०२ हेक्टर ९६.४ टक्के, नांदुरा १ हजार ५०६ हेक्टर ३.१ टक्के, जळगाव जामोद ७ हजार ४६२ हेक्टर १७.९ टक्के, संग्रामपूर ६ हजार ५०१ हेक्टर १४.४ टक्के, चिखली ६७ हजार ३३४ हेक्टर ९१.२ टक्के, बुलडाणा ५४ हजार ३८८ हेक्टर ७२ टक्के, देऊळगाव राजा १२ हजार ७९६ हेक्टर २८.४ टक्के, मेहकर ७९ हजार ४४ हेक्टर ९०.९ टक्के व सिंदखेडराजा तालुक्यात ४० हजार ३३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली असून त्याची टक्केवारी ६१.५ एवढी आहे. 


आतापर्यंत जिल्ह्यात झालेला पाऊस 
४ जुलै पावेतो जिल्ह्यात १२३८.२ मि.मि. पाऊस पडला असून त्याची सरासरी ९५.२ आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुका १२६.९, चिखली १२२.४, देऊळगावराजा ९२.७, सिंदखेडराजा ११३.८, लोणार ११३.८, मेहकर १२०.४, खामगाव ९२.४, शेगाव ७४.४, मलकापूर १०८.४, नांदुरा ५८.६, मोताळा १०४.६, संग्रामपूर ४१.१ व जळगाव जामोद तालुक्यात ६८.६ मि. मि. पाऊस पडला आहे. 


मागील वर्षी याच तारखेपर्यंत झालेला पाऊस 
मागील वर्षी ४ जुलै पर्यंत जिल्ह्यात २५६५.६ मि.मि. पाऊस पडला होता. त्याची सरासरी १९७.४ अशी होती. त्यामध्ये बुलडाणा तालुका २८९ मि.मि., चिखली २२४, देऊळगावराजा १५५, सिंदखेडराजा २११.४, लोणार २२१, मेहकर २७७, खामगाव १८०, शेगाव १२२, मलकापूर १२६, नांदुरा २४१, माेताळा २१३, संग्रामपूर ९८ व जळगाव जामोद तालुक्यात २०८ मि.मि. पाऊस पडला होता. 


सिंचनाची सोय असल्यास पिके वाचवा 
पेरणी होवून पंधरा दिवस झाले असल्यास शेतकऱ्यांनी पिकांची कोळपणी व डवरणी करावी. जेणेकरून जमिनीतील ओलावा जाणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी स्प्रिंक्लरद्वारे पाणी देवून पिकाला वाचवावे. 
- डॉ. सि.पी. जायभाये, कृषी तज्ञ 


दुबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी 
मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पीके धोक्यात सापडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. अशा कठीण परिस्थितीत शासनाने दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत करावी. 
- अनिल जगताप, विभाग प्रमुख शिवसेना 

बातम्या आणखी आहेत...