आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला- विकासाच्या बाबतीत अकोल्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे असलेल्या अमरावती महापालिकेच्या तुलनेने अकोला महापालिकेने मालमत्ता करात दुप्पट वाढ केली आहे. ही करवाढ नसून लूटमार आहे, असा आरोप करीत हा वाढीव कर रद्द न केल्यास काँग्रेसच्या वतीने लवकरच जनआक्रोश आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी महापौर तथा काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष मदन भरगड यांनी दिला आहे.
गुरुवारी, १८ जानेवारी रोजी शहर कोतवाली परिसरातील त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मालमत्ता करवाढीसंदर्भात आपली भूमिका मांडली. यावेळी काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौथरी, नगरसेवक पराग कांबळे, डॉ.जिशान हुसेन उपस्थित होते. मदन भरगड म्हणाले, ज्या कंपनीने फेरमुल्यांकनाचे काम केले, त्यांनी स्वत:च्या स्तरावर निर्णय घेऊन शहरातील संपूर्ण मालमत्ताचे तीन झोनमध्ये विभाजन करुन कर आकारणी केली. विशेष म्हणजे महासभेसमोर टिप्पणी देताना प्रशासनाने मालमत्तांचे तीन झोनमध्ये विभागणी करुन मूल्यांकन करण्याचा प्रस्ताव ठेवला नव्हता. परिणामी महासभेत या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे झोन निहाय दर निश्चित करुन केलेली कर आकारणी ही गैर कायदेशिर आहे. कराची आकारणी करताना पेईंग कॅपॅसिटीचा विचार केला गेला नाही. कारण शहराचा विकास हा कराच्या माध्यमातून होऊच शकत नाही. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केंद्र व राज्य शासनाकडून निधी खेचून आणणे आवश्यक ठरते. मात्र अकोल्यातील लोकप्रतिनिधी यात अपयशी ठरल्याने जनतेवर लूटमार कर लादल्याचा आरोपही मदन भरगड यांनी केला. विशेष म्हणजे महापालिकेने ३० टक्के करवाढ केल्याचा दावा केला असला तरी करवाढ करण्यापूर्वीचे दर आणि आता नव्याने आकारलेले दर यातील तफावत लक्षात घेता, गावठाण बाहेरील क्षेत्रात विविध स्वरुपाच्या बांधकामा निहाय २२, ३५, ४६, ६२, ८३, ९०, ११७, ११८, १२९, १६९ ते २४३ टक्के करात वाढ केली आहे. त्यामुळेच हा लुटमार कर रद्द करण्यासाठी आम्ही जनतेला सोबत घेवून जनआक्रोश आंदोलन करणार आहोत. जनतेनेही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मदन भरगड यांनी केले.
आंदोलन गाजणार
जनआक्रोश आंदोलन नेमक्या कोणत्या पद्धतीने केले जाईल? या प्रश्नाच्या उत्तर मदन भरगड म्हणाले, आंदोलनाचे स्वरुप निश्चित केले आहे. मात्र याबाबतची माहिती लवकरच दिली जाईल. मात्र जनआक्रोश आंदोलन राज्यात गाजेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.