आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरातील एटीएम फोडून पसार होणाऱ्या हरयाणातील चौघांना खामगावात अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- नागपुरातील एटीएम फोडून ५३ लाख रुपयाची रोकड घेवून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या हरियाणा राज्यातील चार आरोपींना खामगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. यावेळी आरोपीच्या ताब्यातून एक देशी कट्टा, तीन जिवंत काडतूस, स्कॉर्पिओ गाडी व रोख ५३ लाख रुपये जप्त केले आहेत. ही कारवाई आज २७ जून रोजी खामगाव- नांदुरा महामार्गावरील चिखली खुर्द येथे करण्यात आली. 


स्थानिक शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वाहतूक पोलिस कर्मचारी हे आज २७ जून रोजी महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल जुगनूजवळ वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान त्यांना दिल्ली पासिंगची एक स्कॉर्पिओ संशयास्पदरित्या जाताना दिसली. यावेळी चालकास गाडीची डिक्की उघडण्याची सुचना केली असता चालकाने वाहनासह पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपी पसार झाले. दरम्यान, चिखली खुर्द गावात काही नागरिकांनी दोघांना बॅगसह पकडले. या बॅगमध्ये पैसे व देशी कट्टा असल्याचे त्यांना दिसून आल्याने त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना पोलिसांच्या हवाली केले. तर दोन आरोपींना नांदुरा रोडवरील एका ढाब्यावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले. अर्षद खान रहेमान खान, आसिफ खान हारून खान, अब्दल्ला मजीद, इरफान खान जाणू खान सर्व रा. हरियाणा अशी आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींची झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक रिवॉल्व्हर, तीन जीवंत काडतुसे, ५३ लाख रुपयाची रोकड व मोबाईल मिळून आले. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले असून रोख रकमेसह देशी कट्टा व स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...