आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरी स्तब्ध : दोन भावंडांसह तिघांवर केले अंत्यसंस्कार, गोव्‍यात समुद्रात बूडून मृत्‍यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पर्यटनासाठी गोव्याला गेलेल्या व समुद्रात बुडून मृत्यू पावलेल्या पाच मित्रांपैकी तिघांचे मृतदेह बुधवारी दुपारी उमरीतील विठ्ठलनगरात त्यांच्या घरी आणले. तिघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. दरम्यान अन्य दोघांचे मृतदेह कोस्टगार्ड यांना शोधण्यात यश आले आहे. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर ते अकोल्याकडे पाठवणार असून, रात्री उशिरापर्यंत ते येथे पोहोचण्याची शक्यता आहे.

 

गोव्यातील समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या युवकांचे कुटुंबीय बुधवारी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी मुलांची वाट पाहतानाच रुग्णवाहिका दारासमोर उभी राहताच त्यांच्या भावनांचा बांध फुटल्याने ते रडू लागले. प्रथम उज्ज्वल वाकोडेंचा मृतदेह आणला. त्यानंतर प्रितेश, चेतन नंदागवळी या दोन भावंडांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून त्यांच्या घरी नेले. या तिघांवर उमरीतील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. विठ्ठल नगरातील उज्ज्वल वाकोडे, प्रितेश नंदागवळी, चेतन नंदागवळी, किरण मस्के, शुभम वैद्यसह त्यांचे १४ मित्र शनिवारी गोवा पर्यटनासाठी रेल्वेने गेले. सोमवारी पहाटे ते कलंगुट बीचवर पोहोचले. उज्ज्वल वाकोडे, प्रितेश नंदागवळी, चेतन नंदागवळी, किरण मस्के, शुभम वैद्य हे समुद्रात उतरले. त्यावेळी समुद्राच्या लाटांनी त्यांना खेचले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान उज्ज्वल वाकोडे, प्रितेश नंदागवळी, चेतन नंदागवळी यांचे मृतदेह आढळले. तीन दिवसांनंतर उज्ज्वल, प्रितेश.चेतन यांचे मृतदेह गोव्यावरून त्यांच्या निवासस्थानी आणले. बुधवारी रात्री उशिरा अन्य दोघांचे मृतदेह सापडले असून, गुरुवारी सकाळी त्यांचे मृतदेह अकोल्याकडे पाठवण्यात येणार आहेत.

 

लोकप्रतिनिधींची श्रद्धांजली
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर यांनी मृतकांच्या आईवडिलांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. अंत्यसंस्कारावेळी पालकमंत्र्यांसह आमदार व नागरिकांनी युवकांना अखेरचा निरोप दिला.

 

उज्ज्वलच्या घरचे केबल कनेक्शन केले होते बंद
गोव्याला गेलेल्या मुलाच्या मृत्यूची बातमी बुधवारपर्यंत उज्ज्वलच्या आईला दिली नव्हती. टीव्हीवर बातमी दिसेल म्हणून त्याच्या घरचे केबल कनेक्शन बंद केले.मृत्यूची बातमी कळताच घरी येणाऱ्या नातेवाईकांना बाहेरच थांबवण्यात आले होते. मुलाच्या निधनाचे दु:ख पचवताना उज्ज्वलच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते. उज्ज्वल हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.

 

'त्या' दाेघांचे मृतदेह सापडले
गोवा येथे पर्यटनासाठी गेलेल्या पाच युवकांचा कळंगुट बिचवर समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. त्यापैकी तिघांचे मृतदेह मंगळवारी सापडले होते. दरम्यान अन्य दोघांचेे मृतदेह बुधवारी रात्री सापडले. सोमवारी मृत्यू झालेल्या तिघांंचे मृतदेह गोवा येथून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने रुग्णवाहिकेद्वारेे येथे आणले.येथील जिल्हाधिकारी पाण्डेय गोव्याचे जिल्हाधिकारी, प्रशासनाच्या संपर्कात होते.
त्यांच्या आईला शोक अनावर आपल्या तरुण मुलांचे मृतदेह पाहून प्रितेश व चेतनच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला. या मातेला व पत्नीला पाहून अनेकांना रडू कोसळले. तसेच एकुलत्या एक उज्ज्वलच्या निधनाच्या घटनेमुळे त्याच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...