आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी खात्यात नोकरीचे आमिष देऊन युवतींना बनवले सेल्सगर्ल, डाटा एन्ट्रीच्या नावे फसवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - कृषी खात्यात नोकरीचे आमिष देऊन युवतींना सेल्सगर्ल बनवणाऱ्या चौघांविरुद्ध खदान ठाण्यात बुधवारी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. या युवकांकडे १००च्या वर मुली सेल्समनचे काम करीत असल्याची बाब समोर आली आहे.

 

यवतमाळ जिल्ह्यातील एक युवती अकोल्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करते. या युवतीच्या नात्यातीलच एकाने तिला कृषी विभागात डाटा एन्ट्री ऑपरेटरची नोकरी लावून देतो असे म्हणून अर्ज भरण्यासाठी तिच्याकडून १६ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर न्यू महसूल कॉलनीमध्ये भाड्याने घेतलेल्या हॉलमध्ये तिला नेले. आधीच तेथे काही मुली होत्या. त्या मुलींमध्ये राहण्याचे सांगून सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य तिला घरोघर विकण्याचे सांगितले. त्यानंतर मुलीला आपली फसवणूक झाल्याचे कळले. तिने त्यांना १६ हजार ५०० रुपये परत मागितले; मात्र त्यांनी देण्यास नकार दिला. युवतीने थेट खदान पोलिस ठाणे गाठले व अंकुश बायकुडे रा. चित्तरवाडी ता. पुसद जि. यवतमाळ, अमोल आगे, घनशाम गायकवाड व उदयसिंग या चौघांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंवी ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असता आरोपींकडे १०० च्या वर सेल्सगर्ल सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य विकण्यासाठी असल्याचे समोर आले. मात्र कंपनीचे प्रॉडक्ट हे नियमानुसार आम्ही विकत असून, कोणत्याही युवतीच्या मर्जीविरुद्ध आम्ही त्यांच्याकडून काम करून घेत नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस तपास करीत असून नेमका प्रकार काय ते तपासाअंती समोर येणार आहे.

 

राहण्याचा, जेवणाचा खर्च आधीच घेतला जातो
सौंदर्य प्रसाधन विकणाऱ्या युवतींकडून कंपनीने प्रत्येकी १६ हजार ५०० रुपये घेतले आहेत. त्यात ५हजार ५०० रुपये जेवण, राहण्यासाठी घेेतात. त्यानंतर त्या युवतींकडे सौंदर्य प्रसाधने विकण्यासाठी देण्यात येतात. त्यातून आलेले कमिशन त्या मुलींना देण्यात येत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली.


अनुचित घटना घडण्याची शक्यता : कंपनीकडे युवक, युवती काम करतात. युवक, युवतींची वेगवेगळे राहण्याची व्यवस्था केलीे. मात्र युवती शहरात फिरत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला.

 

पाच मुलींचे नोंदवले बयाण : पोलिसांनी बुधवारी पाच मुलींचे बयाण नोंदवले. त्यापैकी सर्व मुली घरोघरी सेल्समनचे काम करीत असल्याचे समोर आले. बेताची आर्थिकस्थिती असलेल्या या मुली आहेत. काही मुली शिक्षणासह पैसे मिळावेत म्हणून काम करीत असल्याचेही समोर आले आहे.


युवतींची संख्या १०० च्या वर
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींकडे काम करण्यासाठी युवतींची संख्या १०० च्या वर आहे. यातील किती मुलींची फसवणूक झाली. याबाबत तपास सुरु आहे. काही मुलींचे बयाण आम्ही घेतले आहेत.
- संतोष महल्ले ठाणेदार खदान

बातम्या आणखी आहेत...