आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत केली डवरणी, बांधावर जाणून घेतल्या समस्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - 'एक दिवस शेतकऱ्यांसोबत' या राज्य शासनाच्या संकल्पनेनुसार आज, शनिवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व इतर अधिकाऱ्यांनी थेट बांधावर पोहोचून शेतकरी-शेतमजुरांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. पालकमंत्री डॉ. पाटील व जिल्हाधिकाऱ्यांसोबत शेतात डवरणी केली.


पालकमंत्र्यांच्या रुपात शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या रुपात प्रशासन अशा या संयुक्त दौऱ्यात उभयतांनी शेतकऱ्यांसोबतच बांधावर जेवण घेतले. शिवाय दोघांनीही डवरणीलाही हातभार लावला. अकोला तालुक्यातील डोंगरगाव, सिसा-मासा, उदेगाव, वाशिंबा या गावांच्या शेत शिवारात ही भ्रमंती केली गेली.
राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या की नाही, त्यांना कर्जमाफी, पिकविमा आणि गारपीटचे अनुदान मिळाले की नाही, हरभरा व तूर विक्रीच्या संदर्भातील त्यांच्या अडचणी निस्तारल्या की अद्याप कायम आहेत, हे जाणून घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी शेत शिवारांमध्येच शेतकरी-शेतमजुरांशी संवादही साधला. वाशिंबा येथे सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या दौऱ्यात शासन-प्रशासनाने सदर कामाचीही पाहणी केली.

 

या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी कैलास पगारे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, एसडीओ संजय खडसे, महसूलचे इतर अधिकारी-कर्मचारी व त्या-त्या भागातील प्रमुख शेतकरीही सहभागी झाले होते.

 

पंदेकृवित शेततळ्यांची पाहणी
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शेत-शिवारात विस्तीर्ण शेततळ्यांची बांधणी करण्यात आली आहे. आजच्या दौऱ्यात या शेततळ्यांची पाहणीही केली गेली. या वेळी कुलगुरू डॉ. विलास भाले आणि विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींचे पदाधिकारीही उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी डोंगरगाव येथील एका शेतात डवरणीला हातभार लावला.

 

अपर जिल्हाधिकारीही बांधावर
एक दिवस शेतकऱ्यांसोबत या अभियानांतर्गत महसूल उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले हेही बांधावर होते. त्यांनी अकोला तालुक्यातील माझोडच्या शेत शिवारात पोहोचून शेतकऱ्यांचा हाल-हवाला जाणून घेतला. या दौऱ्यात कर्जापायी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील शेतकरी महिला श्रीमती सविता पुंडे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

 

शिदोरीचा आस्वाद
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी डोंगरगाव येथील एका शेतात शेतकऱ्याच्या शिदोरीतील जेवण घेतले. तत्पूर्वी त्याच शेतात त्यांनी डवरणीलाही हातभार लावला. पेरणी आटोपलेल्या शेतातील रोपे डौलदार दिसत होती. त्यात डवरणीचा आनंद औरच होता.

 

बातम्या आणखी आहेत...