आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे रब्बी उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. वादळी वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडल्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. तर अनेक घरावरील टिनपत्रे उडाली आहे. तर संग्रामपूर तालुक्यात गारपीटीच्या तडाख्यात सापडल्याने सहा मजूर जखमी झाले आहेत. तसेच या गारपीटीमुळे अनेक पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत.
यंदा अत्यल्प व परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी पिकांवर होती. यंदा १ लाख ३४ हजार ३९४ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांची पेरणी केली होती. त्यापैकी हजारो हेक्टर क्षेत्रावरील हरभरा व गहू काढणीच्या बेतात होता. दरम्यान, दि. १० फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यासह विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आज सकाळपासूनच निसर्गाने तांडव करून हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. आज सकाळी आठ वाजेपासून जिल्ह्यात काळेकुट्ट ढग तयार झाले. त्यानंतर काही वेळातच वादळी वारा व अवकाळी पावसासह गारपीटीने सुरूवात करून दिली. काही तालुक्यात बोरा एवढ्या तर काही तालुक्यात चक्क लिंबा एवढ्या गारा पडल्या आहेत. या गारपिटीचा सर्वाधिक फटका नांदुरा व संग्रामपूर तालुक्याला बसला आहे. वादळी वारा व गारपिटीमुळे काढणीवर आलेला गहु जमिनीवर झोपला आहे. तर हरभऱ्याची दाणादाण उडाली आहे.
विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याची सोंगून करून त्याच्या शेतात सुड्या घातल्या होत्या. परंतु वादळी वाऱ्यामुळे या सुड्या शेतात इतरत्र पसरल्या आहेत. वादळी वारा व गारपिटीचा हजारो हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकाला फटका बसला आहे.
संग्रामपूर तालुक्याला गारपिटीने झोडपले : तालुक्यातील बहुतांश ठिकाणी आज सकाळी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर हरबरा, गहु, भाजीपाला, कादा, टरबुज, मिरची आदी पिकासह संत्रा व निंबु फळ बागाचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने बावनबीर येथील शाळेचे टिन पत्रे उडाली असून संग्रामपुर येथील तहसिल लगत झेराक्सचा दुकानाचे नुकसान झाले, तर आलेवाडी येथील अनेक नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली आहेत. तसेच तालुक्यातील पातुर्डा बु सोनाळा, लाडणापुर, बावनबीर येथे गारपीट झाल्यामुळे फळबागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर संजय ढगे यांच्या सह बावनबीर येथील शेतकऱ्याचे टरबुज पिक उद््ध्वस्त झाले. तालुक्यातील आदीवासी भागातील सायखेड, आलेवाडी, सोनाळा, चिचारी, लाडणापुर या परिसरातील टमाटे, मिरची, गहू, कांदा, खरबूज, टरबूज, हरभरा संत्रा निंबुचे नुकसान झाले.
सिंदखेडराजा
आज पहाट उगवली ती पाऊस व ठिकठिकाणी सोबत गारा घेऊन, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करीत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. तालुक्यात ठिकठिकाणी पावसासह सिंदखेडराजा, सावखेड तेजन, माहेरखेड, पिंपळखुटा, जळगाव, शेलगाव राऊत, वाघजाई, साठेगाव, विझोरा, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा, आंबेवाडी, पांग्री काटे, गोरेगांव, उमनगाव, बाळसमुद्र, लिंगा, सायाळा, शेंदूरजन, सावंगी भगत, गुंज, वरुडी आदि परिसरात बोराच्या आकाराची गारपीट झाली. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा, बीजोत्पादनाचा कांदा, तूर आणि रब्बी ज्वारी व हरभऱ्याची शेतातील पसर तसेच आंबा मोहोर, संत्रा, डाळिंब, द्राक्ष, पपई आदि फळपिके तसेच भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईची मागणी आहे.
देऊळगाव मही
शहरासह परिसरात आज सकाळी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. या गारपिटीचा सर्वाधिक फटका रब्बी पीकासह फळ बागांना बसला आहे. येत्या काही दिवसातच काढणीला आलेला गहू व हरभरा मातीमोल झाला आहे. रविवारी दुपारी आमदार शशिकांत खेडेकर यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जावून गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीचा सर्वे करण्याचे निर्देश कृषी अधिकारी व तहसिलदार यांना दिले आहेत. शेतकरी बांधवांनी खचून न जाता धीर धारवा, मी आपल्या सोबतच आहे, या शब्दात आमदार डॉ.शशिकांत दादा खेडेकर यांनी शेतकऱ्यांना आधार दिला. यावेळी त्यांच्या सोबत जि. प. सदस्य मनोज कायंदे, तहसीलदार बाजड, मंडळ अधिकारी हिरवे, कृषी विभागाचे देशमुख व मोरे, तलाठी राजे जाधव यांच्यासह गावकरी व शेतकरी, शिवसैनिक आदी यावेळी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.