आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी प्रॅक्टीकलच्या नावावर गोरखधंदा, डोळे मिटून गुणांची खैरात!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
अकोला - विद्यार्थ्यांच्या जीवनाचा 'टर्निंग पाॅईट' समजल्या जाणाऱ्या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्या असून,अनेक खासगी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षाच 'मॅनेज' केल्या जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या महाविद्यालयात विद्यार्थी कधी तासिकांना जात नाहीत, अशा महाविद्यालयांतील विद्यार्थांना 'डोळे मिटून गुणांची खैरात' केली जात आहे. तासिका तत्वावर अनेक महाविद्यालयात असलेले तेच ते प्राध्यापक अनेक ठिकाणी पर्यवेक्षक असल्याने हा सावळा गोंधळ सुरु असल्याचे चित्र आहे.

 

दरम्यान, या गैरप्रकारामुळे नियमित तासिका होणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थांवर मात्र अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
बारावीचे प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी इंटर्नल (महाविद्यालयातील प्राध्यापक) आणि एक्स्टर्नल (बोर्डाचे प्राध्यापक) प्राध्यापकांच्या नियुक्त्या बोर्डाकडून करण्यात आल्या आहेत. मात्र जी महाविद्यालये शिकवणी वर्गाच्या 'भरोशा'वर आहेत. तसेच त्यांचे विद्यार्थी महाविद्यालयांऐवजी शिकवणी वर्गातच बसतात अशा महाविद्यालयांत विद्यार्थांना पैकीच्या पैकी गुण देण्याची 'विशेष सोय' करण्यात आली असून, काही अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांत प्रात्यक्षिक परीक्षा इमानेइतबारे घेण्यात येत असल्याने तेथील विद्यार्थांना प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये तुलनेत कमी गुण मिळत असल्याचे दिसून आहे. अशा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थांचे प्रात्यक्षिक परीक्षा होत आहे, की कागदोपत्री सोपस्कार पार पाडल्या जात आहेत.भरारी पथकाने कारवाई करणे आवश्यक आहे.

 

चित्रीकरण व्हावे : नियमानुसार प्रात्यक्षिक परीक्षा होत आहे की नाही याच्या अचूक माहितीसाठी प्रात्यक्षिक परीक्षांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याची गरज आहे.

 

एक,दोन गुणांचा फरक ठेवून केले जाते गुणांकन
फिशरी, इलेक्ट्रानिक्स व कॉम्प्युटर सायन्ससाठी प्रत्येकी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी १०० गुण आहेत. तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणितामध्ये प्रत्येकी ३० गुण आहेत, या परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयीन तसेच बोर्डाकडून पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. खासगी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थांना पैकी किंवा एक दोन गुणांचा फरक ठेवून गुणांची खैरात असल्याची माहिती आहे.

 

म्हणूनच वाढतो गुणांचा स्काेर
प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये विद्यार्थांना गुणांची खैरात मिळते. त्यात बोर्ड आणि महाविद्यालयांकडून देण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक गुणांचा समावेश आहे. मराठी, इंग्रजीसाठी प्रत्येकी २० गुण तर पर्यावरण शास्त्रासाठी ५० गुण महाविद्यालयांच्या हातात असतात. त्यामुळे विद्यार्थांच्या गुणांचा स्कोर वाढता दिसून येतो.

 

आजपासून तपासणी करू
प्रत्येक विद्यार्थांचे प्रात्यक्षिक घेऊनच त्यांना गुण देणे बंधनकारक आहे. महाविद्यालयात असे प्रकार होत असतील तर ही गंभीर बाब आहे. प्रात्यक्षिक सुरु असलेल्या महाविद्यालयांमध्ये भरारी पथकाद्वारे तपासणी करू, दोषींवर कारवाई केल्या जाईल.
- प्रकाश मुकुंद , शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.अकोला.

 

बातम्या आणखी आहेत...