आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या नवीन उद्योग धोरणात उद्योग-शिक्षण समन्वयावर भर : हर्षदीप कांबळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राज्याचे नवीन उद्योग धोरण येत्या सहा महिन्यात जाहीर होणार असून, यामध्ये उद्योग आणि शिक्षण यांचा समन्वय साधण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे उद्योगांना लागणारे मनुष्यबळ तयार करण्यात मदत होईल. भविष्याचा विचार करून तसे नियोजन करत असल्याचे उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. 


अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, महापौर विजय अग्रवाल, अकोला इंडस्ट्रीज असो. चे अध्यक्ष कैलास खंडेलवाल, उपाध्यक्ष उन्मेश मालू, मनोज खंडेलवाल, अरुण मित्तल, कमलेश अग्रवाल व्यासपीठावर होते. 


अकोला एमआयडीसीमधील समस्या सोडवण्याबाबत पुढच्या महिन्यात नागपूरला होणाऱ्या अधिवेशनात उद्योगमंत्र्यांसमवेत बैठकीत चर्चा घडवून आणण्याची ग्वाही कांबळे यांनी दिली. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात इंडस्ट्रीज असोसिएशनसोबत सामंजस्य करार करणार असल्याचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले. तसेच, उद्योगांना हवे असणारे मनुष्यबळ निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाचीदेखील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अकोला एमआयडीसीची पाणी समस्या कायमस्वरुपी सुटावी तसेच अकोल्याला प्रादेशिक कार्यालय होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या विषयांकडे उद्योग विकास आयुक्तांचे त्यांनी लक्ष वेधले. सुरुवातीला, प्रास्ताविकात कैलास खंडेलवाल यांनी अकोला आैद्योगिक क्षेत्राला भासणाऱ्या समस्यांबाबत माहिती दिली. संचालन नितीन बियाणी यांनी केले. 


महिला उद्योजकांसाठी नवीन धोरण 
राज्यातील महिला उद्योजकांसाठी नवे धोरण राबवण्यात येत असल्याचे हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. कॅपीटल सबसिडी योजना त्यांच्यासाठी आणत आहोत. याचा महिलांनी लाभ घ्यावा. या बाबत 'मैत्रेयी' वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे, त्यावरून अनेक बाबींचा उलगडा होईल, हेही त्यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...