आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारिप नेते आसिफ खान यांचा खून; मृतदेह फेकला पूर्णा नदीच्या पुरात; ZP महिला सदस्य ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर येथे हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावर आणून पूरामध्ये फेकून देण्यात आला.

 

स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले असून, रात्री उशिरा वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान सदस्य ज्योती गणेशपुरे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच ज्योतीच्या बहिणीची मुले आणि तिच्या मुलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मारेकऱ्यांनी आसिफ खान यांच्या हत्येची कबुली दिली असून, त्यांचा मृतदेह पूर्णा नदीच्या पुरात फेकून दिल्याचेही त्यांनी कबूल केले आहे; मात्र आसिफ खान यांचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडला नाही.


आसिफ खान यांना गुरुवारी 16 ऑगस्टला ज्योती गणेशपुरे यांचा फोन आला होता. तिने आसिफ खान यांना मूर्तिजापूर येथे तिच्या बहिणीकडे भेटायला बोलावले होते. तेव्हापासून आसिफ खान बेपत्ता होते, अशी तक्रार आसिफ खान यांचा मुलगा डॉ. सोहेल खान यांनी बाळापुर पोलिसात दिली होती. आसिफ खान यांचा शोध सुरू केला असता, त्यांची कार म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या काठावर चालू अवस्थेत दिसून आली होती. या कारमध्ये पोलिसांच्या हाती संशयास्पद पुरावे हाती लागले होते. त्यावरून पोलिसांनी तपासाला गती दिली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या पथकाने रविवारी ज्योती गणेशपुरे हिला मुंबईहून ताब्यात घेतले. तसेच मुर्तीजापुर येथून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता आसिफ खान यांची हत्या झाल्याचे समोर आले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी आसिफ खान यांच्याच गाडीत त्यांचा मृतदेह आणला व म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावरुन पुराच्या मध्यभागी फेकून दिला. रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आरोपीला घेऊन घटनास्थळावर गेले होते. ज्या ठिकाणी आसिफ खान यांचा मृतदेह नदीत फेकण्यात आला ती जागा आरोपींनी पोलिसांना दाखवली. खून करण्याची पद्धत, खून कोणी केला, विल्हेवाट कशी लावली, कोणत्या कारणासाठी आरोपीने टोकाचे पाऊल उचलले त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आरोपींची कसून चौकशी करीत असून लवकरच याचा उलगडा होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांनी दिली आहे.
 

नदीपात्रात मृतदेह आढळून आल्यास पोलिसांना माहिती द्यावी

प्रथमदर्शनी तपासामध्ये आसिफ खान यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे मारेकर्‍यांनी त्यांचा मृतदेह पूर्णेच्या पुरात फेकून दिला आहे. नदीकाठच्या नागरिकांना तसेच इतर कुणालाही मानवी मृतदेह आढळून आल्यास त्यासंबंधीची माहिती स्थानिक गुन्हे शाखा किंवा नजीकच्या पोलिसांना द्यावी.

- एम. राकेश कलासागर, पोलिस अधीक्षक

 

संभाषण झाले व्हायरल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आसिफ खान बेपत्ता प्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात दोन व्यक्तींचे संभाषण आहे. यात एक व्यक्ती मूर्तिजापूरकडे न जाण्याचा सल्ला देत असल्याचे समजते. मात्र दुसरीकडून मी आज तयारीत असल्याचा आवाज येत आहे. त्यामुळे या क्लिपच्या आवाजावरुन पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली होती त्यानुसार तपास केला असता अशी खान यांची हत्या झाल्याचे समोर आले.


आज होणार पुन्हा शोध कार्य
पूर्णा नदीपात्रात शोध घेण्यासाठी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने संपूर्ण तयारीसह (बोट व इतर साहित्य) रविवारी 19 ऑगस्टला दुपारी शोधकार्याला प्रारंभ केला. मात्र रात्रीपर्यंत यश मिळाले नाही. त्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात आले असून, सोमवारी 20 ऑगस्टला सकाळी पुन्हा प्रारंभ करण्यात येणार आहे. या बचाव पथकात पथक प्रमुख दीपक सदाफळे, महेश साबळे, सूरज ठाकूर, महेश लकडे, ऋतिक सदाफळे आदींचा समावेश होता.


एसपी एम राकेश कलासागर पोचले होते घटनास्थळावर
आसिफ खान यांची कार सापडलेल्या स्थळाला रविवारी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी संपूर्ण परिसराचे निरीक्षण केले. त्यानंतर ते बोरगाव मंजू पोलिस स्टेशनला गेले. त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कल्पना भराडे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे, बाळापूरचे विनोद ठाकरे, मूर्तिजापूरचे आव्हाडे, बोरगावचे ठाणेदार विजय मगर यांच्याशी चर्चा करुन काही सूचना दिल्या होत्या.

 

48 तासांत पोलिसांनी केले खुनाचे डिटेक्शन

आसिफ खान बेपत्ता झाल्याची तक्रार 17 ऑगस्ट रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांना संशयास्पद स्थितीत आसिफ खान यांची कार पूर्णा नदीच्या काठावर दिसून आली. तेव्हापासून पोलिसांनी घातपाताचा दिशेने तपास सुरू केला. आसिफ खान यांच्याशी कुणाकुणाचे बोलणे झाले? त्यांना कोणी फोन केले? हा सर्व मोबाईल डाटा पोलिसांनी काढला. त्यावरून प्रत्येकाचे मोबाईल लोकेशन पोलिसांनी काढले . या मोबाईल लोकेशनवरून आणि कारमधून जप्त केलेल्या काही वस्तूंवरून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेणे सुरू केले .आणि 48 तासात आसिफ खान यांचा खून झाल्याचे प्राथमिक निष्कर्षपर्यंत पोलिस पोहोचले. पोलिस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतली ते स्वतः घटनास्थळावर गेले एलसीबी मध्ये बसून त्यांनी संशयितांची परेड घेतली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांचे टीमने संशयितांना पकडले आणि पुरावे गोळा केले तर बाळापूर पोलिस, मुर्तीजापूर पोलिस, बोरगाव पोलिसांनी तपास कार्यात मदत करून खुनाचा उलगडा केला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...