आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाची निर्घृण हत्या करून मृतदेह पुरला खड्ड्यात; जुन्या वादातून युवकाचा काढला काटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धाड- मळमळ होत असल्याचे कारण सांगून घराबाहेर पडलेल्या एका युवकाचा निर्दयीपणे खुन करून त्याचा मृतदेह गावापासून एक किलोमिटर अंतरावर असलेल्या नदी काठावरील खड्ड्यात गाडून टाकला. ही खळबळजनक घटना आज (मंगळवार) सकाळी मढ येथे उघडकीस आली.

 

ठाणेदार संग्राम पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांनी या खुन प्रकरणाचा अवघ्या चोविस तासात तपास लावून बाप व तीन मुले, अशा चार जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे मढ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

सूत्रांनुसार, शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मढ येथील 34 वर्षीय विजय पुनीलाल चांदा हा युवक काल रात्री दहा वाजेच्या सुमारास मळमळ होत आहे, असे म्हणून घराबाहेर पडला. परंतु एक ते दीड तास होवूनही तो घरी परत आला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला. परंतु तरी सुद्धा तो सापडला नाही. विजयचा भाऊ राजु चांदा याने धाड पोलिसात भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान आज सकाळी घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार संग्राम पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी भेट देवून तपासाची चक्रे फिरवली.

 

तपासा दरम्यान गावातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीतल्या पुलावर बेपत्ता युवकाची चप्पल व रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर घटनास्थळी तत्काळ श्वान पथक व फोरेन्सिक मोबाइल व्हॅनला पाचारण करण्यात आले.

 

श्वान पथकाने मृतकास गाडल्याची जागा दाखवली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी. महामुनी, नायब तहसिलदार श्रीमती गौर व ठाणेदार संग्राम पाटील यांच्या उपस्थितीत पेालिस कर्मचाऱ्यांनी पुरलेल्या खड्डयातून मृतक विजय चांदाचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी हा खुन जुन्या वादातून झाल्याचे पोलिसांना सांगीतले. त्यानंतर पोलिसांनी तपासाअंती खात्री करून इश्वर रामचंद्र बालोद व त्याची तीन मुले दिवाण, महिपाल व गोपाल यांच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील व गजानन मुंडे हे करीत आहेत. या खुन प्रकरणाचा अवघ्या चोविस तासात तपास लावल्याबद्दल धाड पोलिसांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

 

जुन्या वादातून युवकाचा काढला काटा
जवळपास तीन चार वर्षापुर्वी मुलीच्या विनय भंगाच्या कारणावरून मृतक व आरोपीमध्ये गंभीर स्वरुपाचे भांडण झाले होते. त्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी सदर युवकाचा काटा काढल्याची चर्चा परिसरातील नागरिक करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...