आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाफेडच्या तूर खरेदीतील अनियमितता, निष्काळजीपणा अधिकाऱ्यांना भोवणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- नाफेडमार्फत (नॅशनल अॅग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया) केलेल्या तूर खरेदीतील अनियमितता, निष्काळजीपणा संबंधित अधिकाऱ्यांना भोवणार आहे. जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने तशी निरीक्षणे नोंदवली असून अंतिम निर्णयासाठी ही फाइल जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पाठवली आहे. खासदार-आमदारांनी याबाबत तक्रार नोंदवली होती. 


२ फेब्रुवारी ते १५ मे या काळात अकोल्यासह राज्यात नाफेडमार्फत तूर खरेदी केली. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करायची, संबंधित यंत्रणेने फोनवर मेसेज पाठवून बोलावले, त्या दिवशी संबंधित केंद्रात मोजमापासाठी तूर न्यायची, अशी ही प्रक्रिया होती. परंतु जेवढ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली नाही. त्यामुळे खासदार, आमदारांसह इतर लोकप्रतिनिधींनी थेट गोदाम गाठून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला होता. 


या आढाव्यात इतर जिल्ह्यातील तूर साठवून ठेवल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर खरेदी केली गेली नसून जी तूर साठवून ठेवली ती सिमेंट व खडेमिश्रित असल्याचे वास्तव पुढे आले होते. याच आधारे त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवली होती. याच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गोपाल मावळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. पुरवठा निरीक्षक (सदस्य सचिव) व जिल्हा पुरवठा अधिकारी (सदस्य) हे आणखी दोन प्रतिनिधी या समितीत होते. समितीने तयार केलेला अहवाल व त्यांची निरीक्षणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली. यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी (डीएमओ), प्रतवारी ठरविणारे ग्रेडर, वखार महामंडळाचे साठा अधीक्षक व वाहतूकदार यांच्यावर ठपका ठेवला आहे. या सर्वांनी त्यांना नेमून दिलेली कामे योग्यरीत्या केली नाहीत. त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हे सर्व जण रडारवर आले असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे अहवालात म्हटले आहे. 


४५,९५५ शेतकऱ्यांनी केली नोंदणी: जिल्ह्यात अकोला, तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी, वाडेगाव व पारस या सहा केंद्रांवरुन नाफेडमार्फत तूर खरेदी केली. त्यासाठी ४५ हजार ९५५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यापैकी १७ हजार ९५० शेतकऱ्यांकडून २ लाख ९ हजार ६६८ क्विंटल तूर खरेदी केली गेली. २८ हजार ५ शेतकऱ्यांची तूर खरेदी केलीच नाही. 


काय आहेत निरीक्षणे ? 
- जिल्हा मार्केटिंग अधिकारी (डीएमओ) राजेश तराळे यांनी शेतकऱ्यांना कळविल्या जाणाऱ्या तारखांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. 
- वखार महामंडळाचे साठा अधीक्षक यांनीही तीच चूक केली. तूर कोठली, ती कशी आहे, याची खातरजमा केली नाही. 
- एनसीएमएल कंपनीतर्फे ग्रेडरची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु त्यांनी योग्य असे ग्रेडिंग केले नाही. 
- वाहतूकदारांनी वाहतुकीसाठी वापरलेले ट्रक स्वच्छ केले नव्हते. तुरीपूर्वी त्या वाहनांतून सिमेंटची वाहतूक केली गेली. त्यामुळे तुरीच्या पोत्यांमध्येही सिमेंट मिसळले गेले. 


ग्रेडर पुरवठादार कंपनीवरही ठपका 
विशेष असे की तूर खरेदीतील ग्रेडर हे शासन नियुक्त नव्हते, त्यांची सेवा एनसीएमएल कंपनीतर्फे घेण्यात आली होती. त्यामुळे त्या कंपनीचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्यावरही कारवाई केली जावी, असे चौकशी समितीचे निरीक्षण आहे. त्यांनी योग्य ते नियंत्रण ठेऊन चोखपणे ग्रेडिंग करवून घ्यायला पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही त्यामुळे खडे मिश्रित तूर साठवली गेली. 


अहवाल तपासून घेतो 
जिल्हा उपनिबंधकांच्या नेतृत्वातील समितीने चौकशी अहवाल सादर केला. त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका नाही. मुळात तसे झालेही नाही. केवळ निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. सर्व बाबी तपासून उद्या (बुधवारी) निर्णय घेऊ. - आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी


५५ टक्के दिवसच काम 
जिल्ह्यात नाफेडची सहा केंद्रे तर मूर्तिजापूर व अकोट येथे विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन मार्फत (व्हीसीएमएफ) तूर खरेदी झाली. केंद्रांचा कालावधी सारखाच होता. परंतु त्या कालावधीत ५५ टक्के दिवस काम केले. शेतकऱ्यांकडून तूर खरेदी न केली जाण्यामागे हीही एक उणीव आहे. 

बातम्या आणखी आहेत...