आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता शेतकरी बापाच्या घामाचे दाम वसूल करण्यासाठी प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा -बच्चू कडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे शेतकऱ्यांना शिव्या देत आहेत. त्यामुळे त्याचा सूड म्हणून सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या दाभडी गावातून खा. दानवे यांच्या भोकरदन पर्यंत आसूड यात्रा काढली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठीच शेतकरी कट्टरवाद सुरु केला असून बापाच्या घामाचे दाम   वसूल करण्यासाठी प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा, असे आवाहन प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केले. 


आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेल्या आसूड यात्रेचे आज २५ मे रोजी खामगाव व बुलडाणा येथे आगमन झाले. यावेळी या यात्रेचे कार्यकर्त्यांनी उस्फूर्त स्वागत केले. त्यानंतर धाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जाहीर सभा पार पडली. यावेळी प्रहारचे राज्य कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे, जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख नीलेश गुजर, अजय टप, संभाजी शिर्के, प्रदीप टाकसाळ, विनोद पवार, अनंत उबाळे, विलास ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना आ. कडू म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, दिव्यांग आदींच्या न्याय हक्कासाठी व शेतकऱ्यांच्या हिताची लढाई लढण्यासाठीच आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सत्ता हे प्रहारचे ध्येय नसून सत्तेत बसणाऱ्यांवर लगाम ठेवण्याचे काम आम्ही करीत आहोत. 


या सरकारने शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेला केवळ आश्वासने दिली आहेत. परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मुख्यमंत्री व महत्त्वाचे खाते असलेले मंत्री विदर्भाचे असूनही विदर्भाच्या नशिबी अद्यापही समस्यांच वाढवून ठेवल्या आहेत. एकटा बच्चू कडू या व्यवस्थेच्या विरोधात लढत आहे. आमच्या विचाराचे फक्त पाच आमदार जरी महाराष्ट्राने दिले, तर समृद्धी महामार्गाने फिरणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्याने फिरवल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तूर, हरभरा खरेदीचे पैसे सरकारने पेरणीपूर्वी दिले नाही. तर स्वतःला हातकडी लावून मंत्र्यांच्या घरात मुक्काम करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. देशाच्या नकाशावरून एक तालुका नाहीसा होईल, एवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत. सत्ता बदलली, नोटा बदलल्या. परंतु तुम्ही बदलले नाही. पंढरीला, दीक्षाभूमीला पायी चालत शेतकरी जातो. मात्र साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या झाल्यावरही साधा तहसीलपर्यंत चालून जात नाही, हे दुर्दैव आहे. 


राष्ट्रमाता जिजाऊंच्या संकल्पनेतून छत्रपती शिवरायांनी सर्व जातिधर्माच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. त्याच छत्रपतींच्या नावाने भाजप सरकारने मते मागून जाती धर्मात भांडणे लावून लोकशाहीचा चुराडा केला आहे, असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आ. बच्चू कडू यांनी येथे बोलताना केला. 


दाभाडी येथून प्रारंभ झालेल्या या आसूड यात्रेत विदर्भातूनच नव्हे तर राज्यभरातील साडेपाचशेच्या वर चार चाकी वाहने कार्यकर्त्यांना घेऊन सहभागी झाले आहेत. धाडकडे ही यात्रा निघाली तेव्हा पहिले वाहन दुधा गावात तर शेवटचे वाहन बुलडाणा येथील धाड नाक्यावर होते. 


दानवांचा नाश करण्यासाठी तलवार 
शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान करणाऱ्या दानवी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी बुलडाणा जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यावेळी आ. बच्चू कडू यांना तलवार भेट देण्यात आली. तर खामगाव येथे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी आसुड आेढवून घेतले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...