आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजराजांच्या जलक्रीडेमुळे खंडेरायाची मिरवणूक खाेळंबली, हत्ती 4 तास प्रवरा नदीपात्रात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - श्रीखंडेराय महाराज, माता म्हाळसाबाई व बाणाई यांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मिरवणुकीसाठी आणलेल्या हत्तीने प्रवरेच्या पात्रात जलक्रीडा सुरू करत तेथेच सुमारे चार तास ठाण मांडल्याने विश्वस्त मंडळाच्या नाकी नऊ आले. ही घटना मंगळवारी घडली. त्यामुळे सकाळी सात वाजता सुरू होणारी मिरवणूक तब्बल चार तास उशिरा सुरू झाली.

 
अकोले येथील खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून रविवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी ९ वाजता या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या श्रीखंडेराय महाराज, माता म्हाळसाबाई व बाणाई यांच्या मूर्तींच्या भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नाशिक येथून खास हत्ती, घोडे व उंट पाचारण करण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री २ वाजता हे सर्व प्राणी अकोले येथे दोन ट्रकमधून आणले जात असतानाच अकोलेपासून ५ किलोमीटर अंतरावरील वीरगाव फाटा येथे ज्या ट्रकमध्ये हत्ती  होता, त्याचे टायर पंक्चर झाले. त्यामुळे रात्री ३ वाजता पर्यायी साधनांची व्यवस्था करून पहाटेच्या सुमारास अकोले येथे हत्ती आणण्यात आला. काही भाविकांनी या हत्तीला जवळच्याच प्रवरा नदीपात्रात अंघोळीसाठी नेण्याचा आग्रह माहुताकडे धरल्याने त्यांनी हत्तीला पाण्यात सोडले.    


अखेर हत्ती बाहेर आला
लोकांनी पुलावर मोठी गर्दी केल्याने हत्ती पाण्याबाहेर येईना. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा मिरवणुकीला मोठा विलंब झाला. शेवटी देवस्थान विश्वस्त मंडळाने सकाळी दहा वाजता घोडे व उंट मिरवणुकीत सहभागी करून वाजतगाजत मिरवणूक सुरू केली. भाविकांनी भंडारा उधळून नाचत-गात मिरवणूक काढली. अकराच्या सुमारास हा हत्ती पाण्यातून बाहेर पडला व मिरवणुकीत सहभागी झाला.

 

तब्बल चार तास हत्ती पाण्यात  
निळवंडे धरणाचे आवर्तन सुरू असल्याने  सध्या प्रवरा नदीला भरपूर पाणी आहे. अकोले ते देवठाण रस्त्यावरील प्रवरा पुलाखाली हा हत्ती स्नानासाठी पाण्यात उतरला होता. तो जलक्रीडेत इतका रममाण होऊन गेला की, काही करता पाण्याबाहेर पडायला तयार होईना. ४ तास त्याची जलक्रीडा सुरू होती. या प्रसंगाचा आनंद घेण्यासाठी प्रवरेच्या पुलावर व काठावर लोकांनी तोबा गर्दी केली होती.  

 

बातम्या आणखी आहेत...