आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधातून केला विवाहित युवकाचा खून; अंढेरा येथील 4 आरोपींना 2 मार्चपर्यंत कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंढेरा- प्रेम प्रकरणातून विवाहित मुलीच्या नातेवाईकांनी संगनमत करून एका ३० वर्षीय विवाहित युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना २२ फेब्रुवारीच्या रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अंढेरा येथील पोलिस स्टेशन पासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असलेल्या फिल्टर प्रोजेक्टजवळ घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अवघ्या काही तासातच अटक केली. त्यानंतर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना २ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 


देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथील पारधी वस्तीत विलास खंडू भोसले वय ३० हा विवाहित युवक राहत असून त्याच्या घराच्या बाजूलाच सौ. कल्पना भोसले ही विवाहिता राहते. मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये प्रेम संबंध प्रस्थापित झाले होते. परंतु दोघांच्याही प्रेमाला घरातील नातेवाइकांकडून विरोध होता. त्यामुळे विलास व कल्पना हे दोघे काही दिवसापासून घरातून निघून गेले होते. या प्रकरणी चार दिवसांपूर्वी कल्पनाचा सासरा येणू फुलाराम भोसले यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार सुद्धा दिली होती. दरम्यान, पोलिसांनी दोघांचा शोध लावून त्यांना संध्याकाळी पोलिस ठाण्यात आणले. 


यावेळी विवाहित मुलगी व मुलाच्या नातेवाइकांची पोलिसांनी समजूत काढून मुलीला नातेवाइकांच्या हवाली केले. परंतु विवाहितेला पळवून नेल्याचा राग मुलीच्या नातेवाईकांमध्ये होता. हे प्रकरण निपटल्यानंतर विलास भोसले हा रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घरी जाण्यास निघाला असता पाण्याच्या फिल्टर प्रोजेक्टजवळ दबा धरून बसलेले विवाहितेचे नातेवाईक कैलास येणू भोसले वय २२, सावन येणू भोसले वय २६, निलम बबन भोसले व सासरा येणू फुलाराम भोसले वय ४८ यांनी विलासला गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने विलास हा रक्ताच्या थारोळयात पडला. यावेळी रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने विलासचा जागीच मृत्यू झाला. या खून प्रकरणाची माहिती गावात पसरताच पोलिस प्रशासनासह असंख्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. 


दरम्यान, मृतकाचा भाऊ परिहार खंडू भोसले याच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. व आरोपी कैलास भोसले, सावन भोसले व निलम भोसले यांना आज दुपारी ११.४५ वाजता तर सासरा येणू भोसले यास संध्याकाळी ६.३० वाजता अटक केली. या सर्व आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने २ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार विनायक कारेगावकर हे करीत आहेत. विशेष म्हणजे, या घटनेतील प्रेयसी आणि प्रियकर हे एकाच जातीचे असून नातेवाईक आहेत. दोघेही विवाहित असून आजूबाजूला राहत असल्याने त्यांच्यात काही दिवसांपासून अनैतिक संबंध जुळले होते. 

बातम्या आणखी आहेत...