आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनो, कट्टरवाद विसरून ताकद शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरा -आमदार बच्चू कडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. परंतु त्यांचा कट्टरवाद योग्य नाही. जात, धर्म, पंथ, पक्ष, झेंड्यांचा कट्टरवाद नको तर त्यांनी शेतकऱ्यांचा कट्टरवाद बाळगला पाहिजे, अशी अपेक्षा बाळगत आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी तरुणांमध्ये दडलेल्या महाशक्तीला साद घातली. 


शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आ. कडू यांच्या नेतृत्वातील   प्रहार युवा शक्ती संघटनेने आसूड यात्रा काढली आहे. या यात्रेचा पडाव आज, गुरुवारी अकोल्यात होता. त्यानिमित्त प्रमिलाताई ओक हॉलमध्ये आयोजित 'युवा संवाद'मध्ये त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रहारचे प्रदेशाध्यक्ष बल्लू जवंजाळ, यात्रेचे संयोजक प्रमोद कुकडे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अतुल खुपसे, जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर, युवा आघाडीचे जिल्हा प्रमुख योगेश पाटील, दत्ता महाराज, मंगेश देशमुख आदी मंचावर उपस्थित होते. 


आमदार कडू म्हणाले की, शेतकऱ्यांशिवाय कुणाचेही भागत नाही. त्यामुळे शेतकरी नसूनही त्यांच्या पाठीशी उभे राहणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. विशेषत: ती युवकांची आहे. युवकांनी त्यांची ताकद खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उपयोगात आणली पाहिजे. नेत्यासाठी भांडता-भांडता आपण बापाला विसरतो. परंतु खरी गरज नेत्याला विसरून बापाला जगविण्याची आहे. 'शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर काय खाल धतुरा' असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. 


गेल्या तीन दिवसांत या यात्रेने यवतमाळसह इतर चार जिल्ह्यांचा प्रवास केला. त्यानंतर आज ती अकोल्यात होती. ओक हॉलमधील जाहीर सभेपूर्वी शहरातून वाहन रॅली काढण्यात आली. अकोटवरून ही यात्रा अकोल्यात पोहोचली. 


सरकारने निवडणुकीवेळी ज्या घोषणा केल्या, त्याची पूर्तता अद्याप केली नाही. राज्याच्या अर्थसंकल्पाची केवळ साडे तीन टक्के रक्कम शेतीच्या वाट्याला दिली. कर्जमाफीच्या नावाखालीही शेतकऱ्यांनाच त्रासच दिला. तूर आणि हरभऱ्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. कापसाचे भाव राज्य शासनाने सात हजाराच्या आसपास घोषित केले. केंद्र सरकारने मात्र त्यात तीन हजार रुपये कमी करत चार हजार रुपये आधारभूत किंमत जाहीर केली. अशा अनेक बाबींना स्पर्श करीत सरकारवर आसूड नाही उगारायचा तर काय करायचं, असा प्रश्नही आमदार कडू यांनी उपस्थितांना विचारला यावेळी इतर पदाधिकाऱ्यांचीही भाषणे झाली. संचालन जिल्हा संघटक श्याम राऊत यांनी केले. शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी 'प्रहार'ने काढलेली 'आसूड यात्रा' उद्या, शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या निवासस्थानावर धडक देणार आहे. 


केरळचा तरुण चेहरा सोबत 
या आसूड यात्रेत केरळचा तरुण ओंकार सुब्रमण्यमही सहभागी झाला आहे. शिक्षण आणि व्यवसायानिमित्त तो ठाण्यात राहतो. त्याने इंटरनेटवरून आमदार बच्चू कडू यांची माहिती संकलित केली आणि ती पटली म्हणून प्रहारमध्ये सहभागी झाला. 'मी शेतकरी नसलो तरी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या अन्न-धान्याच्या आधारेच माझे शरीर बनले आहे. अशी आपली कटिबद्धता व्यक्त केली. 


या आहेत आसूड यात्रेच्या मागण्या 
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना केवळ दीड लाखाची नव्हे तर सरसकट कर्जमाफी द्या. 
- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजारांऐवजी किमान एक लाख रुपयांची प्रोत्साहन रक्कम द्या. 
- शेतकऱ्यांच्या हिताच्या शिफारशी असलेला स्वामीनाथन आयोग लागू करा. 
- गोवंश पालनासाठी शेतकऱ्यांना गोरक्षण संस्थांच्या धर्तीवर अनुदान द्या. 
- दुधाची भाववाढ करा, चाऱ्याची सोय करून देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करा. 
- अपंग, निराधारांना दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करा. 

बातम्या आणखी आहेत...