आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तलाक कायद्याच्या विरोधात मुस्लिम महिलांचा मूकमोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- केंद्र शासनाच्या तीन तलाक कायद्याच्या विरोधात शहरात प्रथमच मुस्लिम महिलांचा मूकमोर्चा शरियत प्रोटेक्शन कमिटीच्या वतीने आज २८ मार्च रोजी काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. 


केंद्र शासनाने इस्लाम धर्मियांच्या मुस्लिम पर्सनल लॉ बद्दल मुस्लिम महिला प्रोटेक्शन ऑफ राईट इन मॅरेज बील २०१७ लोकसभेमध्ये पारीत केले आहे आणि सध्या राज्य सभेमध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे मुस्लिम समाज अस्वस्थ असून संपूर्ण देशात लोकशाही मार्गाने विरोध प्रदर्शन होत आहे. भारतीय संविधानाने अनुच्छेद १९ अन्वये प्रदान केलेल्या मुलभूत अधिकारानुसार लोकशाही पद्धतीने आणि शांतीपूर्ण मार्गाने विरोध प्रदर्शन करण्यासाठी केंद्र शासन व राष्ट्रपतींना निवेदन देण्याचे शरीयत प्रोटेक्शन कमिटी महिला विभागातर्फे ठरविण्यात आले. त्या अनुषंगाने आज सकाळी ९.३० वाजता डॉ. जाकीर हुसेन फंक्शन हॉल नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ गवळीपुरा खामगाव येथून मुस्लिम महिलांच्या भव्य मूक मोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा मस्तान चौक, टिळक मैदान, मेन रोड, महावीर चौक, जनता बँक, सिटी पोलिस स्टेशन आदी ठिकाणाहून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात बुलडाणा शहरासह जिल्हाभरातील सर्वच स्तरातील मुस्लिम समाज महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 


महिलांच्या हातामधील फलकावरील मजकुराची चर्चा 
या मोर्चात सहभागी महिलांच्या हातामध्ये तीन तलाक कायद्याविरोधातील मजकूर लिहिलेले फलक झळकत होते. त्यामुळे या फलकावरील मजकुराची चर्चा होत होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात ठिकठिकाणी बंदोबस्तही लावण्यात आला होता.