आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर अभियंत्यांना २० दिवसांपूर्वी सूचना देऊनही शोषखड्डा कागदावरच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी महापौर, उपमहापौरांनी पुढाकार घेतला. या दरम्यान उपमहापौर वैशाली शेळके यांनी २० दिवसापूर्वी शहर अभियंत्यांना महापालिका कार्यालय परिसरात शोष खड्डा नसल्याने त्वरित शोषखड्डा करण्याचे आदेश दिले. शोषखड्डा करण्यासाठी महापालिकेकडे स्वत:ची यंत्रणा असताना, ही सूचना देवून २० दिवसाचा कालावधी झाला असला तरी अद्याप महापालिका कार्यालयात शोषखड्डा झालेला नाही. त्यामुळे महापालिकेत अधिकारी शिरजोर, पदाधिकारी कमजोर, असे चित्र निर्माण झाले आहे. 


भूजलाचा केवळ उपसाच केल्याने भूजलाची पातळी चिंताजनक परिस्थितीत खोल गेली आहे. यासाठी पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्या शिवाय कोणताही पर्याय नाही. दिव्य मराठीने या अनुषंगाने वृत्त मालिका प्रकाशित केली. या वृत्त मालिकेमुळे सर्व सामान्य नागरिक, पदाधिकारी, प्रशासन पुढे सरसावले. महापौरांनी २०० शोषखड्डे करण्याचा निर्णय घेतला तर उपमहापौरांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवण्याचे व ती कशी राबवावी? याची माहिती देणारी पत्रके घरोघरी वाटली. या योजनेला सर्व सामान्य नागरिकांनी प्रतिसाद देत, आपल्या घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवली. एकीकडे शहरात नागरिक आपापल्या घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवत असताना, दुसरीकडे मात्र महापालिका कार्यालयातील रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना मोडकळीस आली आहे. ही बाब लक्षात घेवून उपमहापौर वैशाली शेळके यांनी शहर अभियंता इक्बाल खान यांना महापालिका कार्यालय परिसरात त्वरित शोषखड्डा करण्याची सूचना केली. या सूचनेला दहा दिवस लोटूनही शोषखड्डा न झाल्याने याबाबतची माहिती तसेच इक्बाल खान यांना शोष खड्डा करण्याचे आदेशित करण्यात यावी, असे मागणी करणारे निवेदन महापौर आणि प्रशासनाला देवूनही दहा दिवस लोटले. परंतु अद्यापही महापालिका कार्यालय परिसरात शोषखड्डा झाला नाही. अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण सूचनांचे पालन करीत नसल्याने महापालिका कार्यालय परिसरात मात्र पावसाचे पाणी जमिनीत जिरवले जात नाही. 


शोषखड्डा करण्यासाठी स्वत:ची यंत्रणा 
सर्व सामान्य नागरिकांना शोषखड्डा करण्यासाठी स्वत:चा पैसा खर्च करावा लागतो. मात्र महापालिकेला स्वत:च्या इमारतीत शोषखड्डा करण्यासाठी स्वत:ची यंत्रणा आहे. शोषखड्डा करण्यासाठी जेसीबी मशीन असून त्यात टाकावे लागणारे साहित्य जमा करण्यासाठी महापालिकेला पैसा खर्च करण्याची गरज नाही. रस्त्यावर अनेक ठिकाणी बांधकामाचे साहित्य ठेवले आहे. रस्त्यावर अशा प्रकारे बांधकामाचे साहित्य ठेवता येत नाही. त्यामुळे हे साहित्य जप्त करून त्यातूनच हा शोषखड्डा भरला जाऊ शकतो. मात्र केवळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे काम रखडले आहे. 


खर्च अधिक असल्याने निविदा बोलावणार 
महापालिका कार्यालयात एकूण चार ठिकाणी तर अधिकारी निवासस्थान या ठिकाणी एक असे एकूण पाच शोषखड्डे करायचे आहेत. यासाठी तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च आहे. याची फाईल आयुक्तांकडे पाठवली आहे. कामाची रक्कम अधिक असल्याने या कामाच्या निविदा बोलावण्यात येतील. 
- इक्बाल खान, शहर अभियंता महापालिका 

बातम्या आणखी आहेत...