आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे विशाल इंगळे मनपाच्या स्थायी समितीचे १४ वे सभापती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिका स्थायी समितीचे १४ वे सभापती म्हणून भारतीय जनता पक्षाचे विशाल इंगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. १२ मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा एकच दिवस होता. यात केवळ विशाल इंगळे यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे मंगळवारी १३ मार्चला त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. 

 

महापालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. भाजपचे ४८ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे स्थायी समितीच्या १६ सदस्यांत भाजपचे १० सदस्य नियुक्त झाले. त्यामुळे पाचही वर्ष स्थायी समिती सभापतीपद हे भाजपकडेच राहणार आहे. २०१७-२०१८ या वर्षाकरीता बाळ टाले यांची सभापती म्हणून निवड झाली होती. २८ फेब्रुवारीला १६ पैकी ८ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने त्यापूर्वीच ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून ८ सदस्य निवृत्त करण्यात आले तर दोन सदस्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे स्थायी समितीत १० सदस्यांची निवड करण्यात आली. यापैकी दोन सदस्यांची निवड ही एक वर्षासाठी केली आहे. स्थायी समिती सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आल्या नंतर विभागीय आयुक्तांनी १३ मार्चला सभापती निवडणूक जाहीर केली. त्या अनुषंगाने १२ मार्च रोजी सभापतीपदाकरीता उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते. सायंकाळी पाच पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते. पाच वाजे पर्यंत केवळ विशाल इंगळे यांचाच उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. १३ मार्च रोजी त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. 


असे आहेत १४ वे सभापती : स्थायी समितीचे १४ वे सभापती प्रभाग क्रमांक १४ -अ मधून निवडून आले आहेत. विशाल इंगळे यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहेत. त्यांचे वडील श्रावण इंगळे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांचा प्रशासनावर वचक होता. राजकारणा सोबतच समाज कार्यात असलेले विशाल इंगळे यांनी बी.ए. केले असून, त्यांचा हॉटेलिंगचा व्यवसाय आहे. 


सर्व आघाड्या लक्षात घेऊन निवड : स्थायी समिती सभापतीपदी हद्दवाढ झालेल्या भागातील प्रतिनिधीची निवड होईल, ही बाब निश्चित मानली जात होती. दरम्यान सुनील क्षीरसागर, विशाल इंगळे तसेच अर्चना मसने यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. पुढे विशाल इंगळे आणि सुनील क्षीरसागर यांच्यापैकी एकाची निवड होईल, ही बाब निश्चित झाली. नव्याने समाविष्ट झालेल्या भागाने भाजपच्या पारड्यात भरभरुन मते टाकली. त्यामुळे शिवणी, शिवर, मलकापूर, उमरी, भौरद आदी परिसरातून भाजपचे उमेदवार विजयी झाले. मलकापूर, शिवनी, शिवर या भागात इंगळे कुटुंबियांची चांगली पकड आहे. त्यामुळे विशाल इंगळे यांची निवड करुन एकीकडे हद्दवाढ झालेल्या भागाला प्रतिनिधीत्व देऊन त्या भागाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतानाच भाजपने २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जातीय समीकरणही साधण्याचा प्रयत्न केला. विशाल इंगळे यांच्या या निवडीवर मंगळवारी अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. 
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपचे विशाल इंगळे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर विजय अग्रवाल, भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, राहुल देशमुख, विनोद मापारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. 


...तर आता पर्यंत झाले असते १६ सभापती 
महापालिका २००१ साली अस्तित्वात आली. तर २००२ मध्ये महापालिकेची पहिली निवडणूक झाली. या अनुषंगाने विचार करता विशाल इंगळे हे १७ सभापती ठरले असते. मात्र विविध तांत्रिक कारणांमुळे २०११-२०१२, २०१३-२०१४, २०१४-२०१५, २०१५-२०१६ या वर्षी स्थायी समिती सभापतीची निवडच होऊ शकली नाही. ही निवड झाली असती तर विशाल इंगळे हे १७ वे सभापती ठरले असते. तर आता पर्यंत दोन वेळा सभापती होण्याचा मान स्व.पप्पु शर्मा आणि विजय अग्रवाल यांना मिळाला आहे. 


आतापर्यंत झालेले सभापती 
व त्यांचा कार्यकाळ 
विजय देशमुख २००२-२००३ 
संजय बडोणे २००३-२००४ 
विलास शेळके २००४-२००५ 
संजय शेळके २००५-२००६ 
सुनील मेश्राम सभापती निवडीसाठी 
सुनील शुक्ल २००६-२००७ 
रफिक सिद्दीकी २००७-२००८ 
साजिद खान २००८-२००९ 
पप्पु शर्मा २००९-२०१० 
पप्पु शर्मा २०१०-२०११ 
विजय अग्रवाल २०१२-२०१३ 
विजय अग्रवाल २०१६-२०१७ 
बाळ टाले २०१७-२०१८ 
विशाल इंगळे २०१८-२०१९ 

बातम्या आणखी आहेत...