आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्‍यात मनपाने केजीच्या विद्यार्थ्यांना सोडले वाऱ्यावर, शिक्षकांनी साेडल्या शाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिका शाळांमधील रोडावलेली विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, या उदात्त हेतूने महापालिकेने २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षात ३२पैकी ३० शाळांमध्ये केजी-१ वर्ग सुरु केला. यासाठी मानसेवी तत्वावर शिक्षिका व मदतनिस नियुक्त केल्या.

 

शाळेचे सत्र एप्रिलपर्यंत चालणार असताना या शिक्षिका,मदतनिसांना मात्र ३१ जानेवारी पर्यंतचेच कामाचे आदेश देण्यात आले. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून हे मानसेवी शिक्षक कामाचे आदेश नसताना आपले कर्तव्य निभावत आहेत. आता कामाचे आदेश मिळणार नाही, याची खात्री पटल्याने उपजिविकेसाठी काही शिक्षिकांनी दुसऱ्या शाळा निवडल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे केजी-१ आणि केजी-२ चे विद्यार्थी मात्र वाऱ्यावर पडले आहेत.

 

दिवसे दिवस महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत आहे. पालकांमध्ये जागरुकता निर्माण झाल्याने प्रत्येक पालक आपल्या पाल्ल्याला खासगी तसेच इंग्रजी शाळेत घाततो. महापालिका शाळांची घसरलेली शैक्षणिक गुणवत्ता व इंग्रजी माध्यमाच्या अभावामुळे महापालिकेला पहिल्या वर्गासाठी विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन महापालिकेने २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या प्रत्येक शाळेत केजी-१ वर्ग सुरु केला. तर ज्या दोन-चार शाळेत केजी-१ वर्ग पूर्वीपासून सुरु होता, तेथे केजी-२ वर्ग सुरु करण्यात आला. यासाठी नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून शिक्षिका व मदतनिस यांची नियुक्ती करण्यात आली.

 

महापालिकेच्या या निर्णयाचा फायदाही महापालिका शाळांना झाला. केजी-१ वर्गात महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थी मिळाले. काही शाळांमध्ये तर ही संख्या ७० पेक्षा अधिक आहे. केजी-१ त्या नंतर केजी-२ आणि पुढे पहिल्या वर्गात याच विद्यार्थ्याना सेमी इंग्रजी मध्ये प्रवेश द्यायचा, असे धोरण महापालिकेने निश्चित केले होते. मात्र केजी-१ वर्गासाठी ज्या शिक्षिका नियुक्त केल्या त्या शिक्षिकांना ३१ जानेवारी पर्यंतच कामाचे आदेश देण्यात आले. ३१ जानेवारीनंतर काही दिवसांनी आपल्याला कामाचे आदेश दिले जातील, अशी अपेक्षा बाळगून काही शिक्षिकांनी तसेच मदतनिसांनी आपले कर्तव्य बजावले. मात्र महापालिकेत वारंवार चकरा मारुनही कामाचे आदेश मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने काही शिक्षिकांनी पोटाची खळगी भरण्यासाठी दुसरीकडे नोकरी शोधणे सुरु केले आहे. या सर्व प्रकारामुळे केजी-१ मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी मात्र वाऱ्यावर पडले असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

 

पुढच्या वर्षी विद्यार्थी मिळणे अवघड
शैक्षणिक सत्र एप्रिलमध्ये संपुष्टात येते, ही बाब माहिती असताना देखील या शिक्षिकांना जानेवारी तर काही शिक्षिकांना फेब्रुवारीपर्यंत कामाचे आदेश देण्यात आले. या शिक्षिकांचे कामाचे आदेश संपुष्टात आल्या नंतर दोन-चार दिवसांच्या खंडाने त्यांना पुन्हा कामाचे आदेश देणे क्रमप्राप्त होते. मात्र असे झाले नाही. केजी-१ सुरु झाल्याने पालकांनी पाल्यांना महापालिका शाळेत घातले. मात्र आता एैन परीक्षेच्या काळातच शिक्षिका नसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे पुढील शैक्षणिक वर्षात महापालिका शाळांना विद्यार्थी मिळणे अवघड होवून बसणार आहे.

 

खासगी शाळा सोडल्याचा शिक्षिकांना पश्चाताप
महापालिकेने शिक्षिकांना तीन हजार रुपये तर मदतनिसांना एक हजार रुपये प्रतिमाह मानधन दिले. काही खासगी शाळांमध्ये शिक्षिकांना यापेक्षाही कमी वेतन असल्याने अनेक शिक्षिकांनी महापालिका शाळा ज्वाईन केल्या. तर दुसरीकडे अनेक शिक्षिकांवर कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावण्याची जबाबदारी असल्याने अनेक शिक्षिका त्रस्त झाल्या आहेत.

 

आता गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकवणार कोण ?
अनेक शिक्षिकांनी शाळा सोडल्याने या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे केजी-१ आणि केजी-२ मधील विद्यार्थ्यांची कोणतीही चुक नसताना त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

 

मुदतवाढीची फाईल प्रस्तावित
काही शिक्षिकांचे कामाचे आदेश ३१ जानेवारी तर काही शिक्षिकांचे २८ फेब्रुवारीला कामाचे आदेश संपुष्टात आले. या शिक्षिकांना खंड देवून मुदतवाढ देण्यात येणार आहे. मुदतवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडे प्रस्तावित केला आहे. लवकरच त्यांना कामाचे आदेश दिले जातील.'' - अनिल बिडवे- प्रभारी शिक्षणाधिकारी

बातम्या आणखी आहेत...