आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याची सरासरी जलपातळी २.२८ मीटरने घसरल्याने टंचाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने प्रभागांमध्ये दररोज सरासरी तीन-चार ठिकाणी बोअर करण्यात येत आहेत. यामुळे जमिनीची अक्षरशः चाळणी होत आहे. २००-२५० फूट खोदकाम केल्याशिवाय पाणी लागत नाही. काही ठिकाणी तर ३०० फुटावर खोदावे लागत आहे. तरी देखील पाणी लागेल की नाही, या बाबत शाश्वती राहिलेली नाही. जिल्ह्याची जलपातळी २.२८ मीटरने घसरली आहे. सर्वाधिक घसरण अकोट तालुक्यामध्ये ३.११ मीटर एवढी आहे. 


या उन्हाळ्यामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार असल्याची चिन्हं ऑगस्ट, सप्टेंबरपासूनच दिसू लागली होती. आणि आता एप्रिल महिन्यात तर लोकांची पाण्यासाठी ससेहोलपट होत आहे. मिळेल तेथून पाणी उपलब्ध करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. 


अनेक ठिकाणचे बोअर, हायड्रंट आटले : शहरातील बोअर, हायड्रंट आटल्याने टँकरने पाणी मागवावे लागत आहे. तसेच पिण्यासाठी वॉटरकॅनवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शहरात तसेच आजूबाजूच्या भागातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाणी समस्या गंभीर बनली आहे. गुप्ते मार्गावरील सदनिकांमध्ये ३५० फूट खोल बोअर करण्यात आले. तेथील रहिवाशांना व्यवस्थित पाणी मिळत नसल्याने आणखी खोल जावे लागेल की काय, अशी भीती नागरिकांना होती. परंतु बोअरमधील माती काढण्यात आल्याने त्यांना पाणी मिळू लागले आहे. खारपाणपट्ट्याला लागून असलेल्या शहरी भागातील लोकांना तर गोड पाणी मिळत नाही. आर. आे. मशीन लावा किंवा अॅक्वा पाणी घेण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. जे लोक गेली तीस, चाळीस वर्षे या भागात राहत आहेत. त्यांना बाेअरच्या पाण्याची सवय झालेली आहे. अन्यथा गोड्या पाण्यासाठी दररोज रेल्वे स्टेशन, गुरुद्वारा किंवा लगतच्या भागातून कॅनद्वारे पाणी आणण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. 


कापशी तलावातील गाळ काढणे सुरु :(कै.) विनयकुमार पाराशर नगराध्यक्ष असताना त्यांच्या काळामध्ये कापशी तलावातून शहराला पाणी पुरवठा होत होता. आताही जुन्या शहराची गरज कापशी तलावातून भागू शकते. त्यामुळे काटेपूर्णा तलावावरील भार कमी होऊ शकतो. त्यादृष्टीने महापौर विजय अग्रवाल यांनी लक्ष घातले आहे. कापशी तलावातील गाळ काढणे सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात तलावामध्ये पाणी साचल्यास त्याचा उपयोग भविष्यात केला जाऊ शकतो, त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. 


शहरात ३५०० बाेअर, ८५० ची पडणार भर : महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ३५०० बोअर आहेत. त्यानंतर मनपाच्या जलप्रदाय विभागाने आणखी ८५० बोअर करण्याचे ठरवले आहे. परंतु त्यावर बंधने येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बंद पडलेल्या स्टँडची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्याऐवजी नवीन बोअर करण्यावर कल दिसून येतो. त्यामुळे जमिनीला आणखी हादरे बसत आहेत. 


प्रभागांत दररोज सरासरी तीन-चार ठिकाणी बोअर 
अनियंत्रित बोअर घेण्याच्या प्रकाराला जिल्हा प्रशासन विशिष्ट परिस्थितीत बंधने घालू शकतात, अशी माहिती भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. २००५-०६ च्या पाणीटंचाईच्या वेळी असे बंधने घातले होते,अशी माहिती देखील या वेळी देण्यात आली. 


पाण्याचे महत्त्व ओळखणे गरजेचे 
गोड्या पाण्याचा वापर वाहन धुणे, झाडांना पाणी देण्यासाठी करतो. गोड पाणी जपून वापरण्याची गरज आहे. भावी पिढ्यांचा विचार करुनच पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. जल पुनर्भरणाकडे सर्वांनाच लक्ष द्यावे लागणार आहे. आर.टी. शेलार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, 
थेट कायदा नाही पण सार्वजनिक वापराच्या स्रोताला अडसर नको 
एखादा व्यक्ती स्वत:च्या मालकीच्या जागेत बोअरवेल बांधत असेल तर त्याबद्दल कुणालाही आक्षेप घेता येत नाही. परंतु त्या बोअरवेलमुळे सार्वजनिक वापराची बोअरवेल अर्थात सार्वजनिक पाणी पुरवठा अडचणीत येत असेल तर मात्र प्रतिबंध घालता येतो. यासाठीही ५०० मीटर अंतराची अट आहे. शहरात शक्यतो सार्वजनिक वापरासाठी बोअरवेलचा वापर केला जात नाही. परंतु ग्रामीण भागात काही गावांमध्ये असे स्रोत आहेत. याबद्दल तक्रार आल्यास मार्ग काढता येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी 'िदव्य मराठी'ला सांगितले. 


आलेली जलपातळी या प्रमाणे 
तालुका ५ वर्ष सरासरी मार्च २०१८ पर्यंत फरक 
अकोला १०.१२ १२.९८ - २.८६ 
अकोट ११.५५ १४.६६ - ३.११ 
बार्शिटाकळी ८.१४ १०.२३ - २.०९ 
बाळापूर १०.३४ ११.०७ - ०.७३ 
मूर्तिजापूर ८.६१ ११.१२ - २.५१ 
पातूर ७.०८ ८.९५ -१.८७ 
तेल्हारा २१.७४ २४.५४ - २.८० 

बातम्या आणखी आहेत...