आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्लास्टिक पिशव्यां'चा वापर; ११ कारवाया, ५५ हजारांचा दंड वसूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेच्या वतीने सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच २५ जुन रोजी शहरात ११ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ५५ हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. ही मोहिम आणखी काही दिवस सुरु ठेवली जाणार आहे. या मोहिमेमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 


शासनाच्या वतीने प्लास्टिक पासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (कॅरीबॅग, हॅंडल असलेल्या व नसलेल्या थैल्या) थर्माकाेल व प्लास्टिक पासून बनवण्यात आलेले व एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे ताट, कप, ग्लास, चमचे, वाटी, भांडे तसेच हॉटेल्समध्ये पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे भांडे व वाटी, स्ट्रॉ, नाॅन वोवेन पॉलीप्रोपिलीन बॅग्ज, सजावटीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, थर्माकोल, द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच, कप, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ आदी साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक यावर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असे प्लास्टिक बाळगल्यास अथवा त्याचा वापर केल्यास पाच हजार व त्यापेक्षा अधिक दंड आकारला जाणार आहे. शनिवार पासून महापालिकेच्या वतीने ही कारवाई सुरु आहे. 


सोमवारी महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने बालाजी मेडिकल, चिराणीया अॅन्ड सन्स, रिया क्रिएशन, एम.पी.आहुजा, विजर सुपर शॉपी, सन्नी mस्वीट मार्ट आदी ११ व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई आरोग्य निरीक्षक आय.एम.काजी, नितीन नागलकर, अब्दुल मतीन, महंमद अलीम, सिद्धार्थ भागडे, किरण खंडा्रे, शैलेश पवार, रूपेश मिश्रा, प्रताप राऊत, दीपाली घाडगे, डॉ.सवी माहोत, कुणाल भातकुले, प्रशिस भातकुले, शुभम पुंड, आशिष इंगोले, सोहम कुळकर्णी, सुनील कंडेरा आदींनी केली. 


बंदी असलेले साहित्य जमा करा 
ज्या व्यावसायिकांकडे बंदी असलेले प्लास्टिक साहित्य जवळ न ठेवता अथवा त्याचा वापर न करता महापालिकेच्या मोटर वाहन विभागात जमा करुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 


कापडाच्या पिशव्यांची मागणी वाढली 
प्लॉस्टिक पिशवी वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करताना महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी. 
कॅरी बॅगवर बंदी आल्याने तसेच दंडात्मक कारवाई होत असल्याने आता अनेक व्यापाऱ्यांनी कॅरीबॅग ठेवणे बंद केले आहे. एखाद्या ग्राहकाने कॅरीबॅगची मागणी केल्यास दंडाचे पाच हजार भरा, मग कॅरी बॅग मिळेल, अशी सुचनाही व्यावसायिक करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...