आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी जिरवणे, काटकसर, पुनर्वापराच्या योग्य समन्वयानेच सुटणार जलसंकट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पावसाळ्यात काही दिवसातच जोराचा पाऊस पडतो अन् ते पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून जिरवणे खूप महत्त्वाचे आहे. यासोबतच स्रोत निर्माण करणे, असलेल्या पाण्याचा काळजीपूर्वक काटकसरीने वापर अन् पुनर्वापर करणे याचे योग्य प्रकारे समन्वय केले आणि प्रत्येकाने ते पाळले तरच   पाणी टंचाईच्या समस्येतून मुक्तता होणार आहे, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी पद्धती व पर्यावरण केंद्राचे संचालक डॉ. सुभाष टाले यांनी व्यक्त केले. महापालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात २४ मे रोजी रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले. दिव्य मराठीने भूजलाची चिंताजनक घटलेल्या पातळीवर वृत्तमालिका प्रकाशित केली होती. 


या वृत्तमालिकेचे सर्व स्तरातून कौतुक झाले. याच अनुषंगाने महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत कार्यशाळा घेण्याचे आश्वासन दिले होते. या अाश्वासनाला पाळत आज २४ मे रोजी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत उपमहापौर वैशाली शेळके, आयुक्त जितेंद्र वाघ, डॉ. राम शिंदे, भूवैज्ञानिक बर्डे, आशिष धाडे उपस्थित होते. डॉ. सुभाष टाले यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व विषद करत विविध पद्धती सांगितल्या. पाण्याचे पुनर्भरण करण्याचा साधा अर्थ असा की माझ्या छतावर पडणारे पाणी, माझ्या अंगणातील पाणी माझ्या अंगणातच अडले पाहिजे. पाण्याचा गुणधर्म वाहून जाण्याचा आहे. त्यामुळे ते जोपर्यंत अडवून जिरवणार नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. पुनर्भरणाच्या विविध पद्धती आहेत. त्यापैकी कोणत्याही पद्धतीने पुनर्भरण होणे महत्त्वाचे आहे. परंतु पावसाचे पाणी थेट बोअरवेल मध्ये सोडणे चुकीचे ठरेल, असे त्यांनी सांगितले. 


आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज आहे. मात्र, यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मनपातील पदाधिकारी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सहभाग घेऊन या योजनेला लोकचळवळीचे स्वरूप देणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. यावेळी डॉ. राम शिंदे, भूवैज्ञानिक बर्डे, आशिष धाडे यांनी देखील मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी केले. कार्यशाळेला शहरातील हॉटेल व्यावसायिक, मंगल कार्यालयांचे संचालक, शाळांचे मुख्याध्यापक, क्रेडाईचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. कार्यशाळेत उपस्थितांनी जलतज्ज्ञांना विविध शंका आणि प्रश्न विचारले. यानिमित्ताने सभागृहात योजनेबद्दल चर्चा रंगली. या सर्व शंकांचे निरसन उपस्थित जलतज्ज्ञांनी केले. 


महापालिका स्थापन करणार मार्गदर्शन केंद्र 
रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत सर्व सामान्य नागरिकांनी संपूर्ण माहिती, त्याचे फायदे, महत्त्व कळावे यासाठी महापालिका कार्यालयात लवकरच मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात येणार असून, या केंद्रात तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील अशी घोषणा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केली. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

नगरसेवकांनी मारली दांडी 
टँकरसाठी वणवण भटकणाऱ्या आणि पाणी समस्येचा खऱ्या अर्थाने सामना करणाऱ्या नगरसेवकांनी या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात दांडी मारली. मोजके नगरसेवक कार्यशाळेला उपस्थित होते. मात्र, तेही काही वेळ थांबून निघून गेले. विशेष म्हणजे त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांशी टँकरबाबत चर्चा केली. 

बातम्या आणखी आहेत...