आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम घरटी बसवून १२ वर्षांपासून चिमण्यांचे पोटच्या गोळ्याप्रमाणे संगोपन, आतापर्यंत हजारांवर चिमण्यांनी घेतली गगन भरारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातील तिरुपतीनगर येथील मंजू पवार यांच्या घराच्या अंगणात पाय टाकताच परिसरात सर्वत्र चिमण्यांसाठी केलेली कृत्रिम घरटी लक्ष वेधून घेतात. पवार या पोटच्या गोळ्यांप्रमाणे चिमण्यांसह अन्य पक्ष्यांची काळजी घेतात. मागील १२ वर्षांमध्ये त्यांच्या घरातून जवळपास एक हजार चिमण्यांनी खुल्या आसमंतात भरारी घेतली असल्याची माहिती पवार यांनी दिली. 

 

घरातील बेडरूम, खिडक्या, बगीचा येथे कृत्रिम घरटी ठेवून चिमण्यांना दिवसभर दाणापाणी देण्याचा छंद पवार यांच्या त्रिकोणी कुटुंबाने जोपासला आहे. जवळपास १२ वर्षांपूर्वी घरात जागेच्या शोधत आलेल्या चिमणाचिमणीची भाषा समजून घेत त्यांच्यासाठी कृत्रिम घर उपलब्ध करून देणाऱ्या मंजू यांचे या घटनेमुळे जीवनच बदलून गेले. त्यांनी घरात ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बनवलेली आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्यांना त्यांचे पती एलआयसीमध्ये विकास अधिकारी असलेले मुकेश पवार यांचे पुर्ण सहकार्य मिळते. चिमणी संवर्धनाचा छंद जोपासलेल्या पवार यांच्या घरातील पक्ष्यांचा वावर आश्चर्यचकित करणारा आहे. मैना, साळुंकी, बुलबुल, शिंजिर, काळी चिमणी, पारवा, कोकिळा, सातभाई, भारद्वाज, दयाळ, सनबर्ड, शिकारा या पक्षांसह खारुताई, मांजर आदी प्राणीही त्यांच्या घरात राहतात. पक्ष्यांच्या सवयी, त्यांना असणारे धोके, त्यांचे आवडते खाद्य, प्रसंगानुरूप बदलणारे त्यांचे आवाज या सर्व बाबींचे त्या बारकाईने निरीक्षण करतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेत परिसरातील काही शेजाऱ्यांनीही आपापल्या घरात चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बसवली आहेत. चिमण्यांना सकाळी पहिला घास दिल्यानंतरच त्यांच्या दिवसाला सुरुवात होते. बागेत त्यांनी पक्षांसाठी दाणापाण्याची व्यवस्था केली आहे. 


अन्य पक्ष्यांसह प्राण्यांचाही आहे घरात वावर 
पवार यांच्या घरात ठिकठिकाणी चिमण्यांच्यासाठी अशी कृत्रिम घरटी तयार केली आहेत. चिमण्यांचे संवर्धनासाठी वेळप्रसंगी पवार त्यांची अशी काळजी घेतात. 


४ घरट्यांमध्ये आहेत १२ ते १५ पिल्ले 
सद्यःस्थितीत पवार यांच्याकडे चिमण्यांसाठी १६ कृ़त्रिम घरटी आहेत. त्यापैकी चार घरट्यांमध्ये जवळपास १२ ते १५ चिमण्यांची पिले असून दोन ते तीन घरांमध्ये चिमण्यांनी अंडी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. 


प्रत्येकाने घ्यावा चिमण्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार : मानवाच्या अती भौतिकतावादी होण्याचा फटका हा चिमण्यांना व अन्य पक्ष्यांना बसलेला आहे. त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पुढील पिढीला चिमणीचे दर्शन व्हावे, यासाठी आतापासून प्रत्येकाने त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत मंजू पवार यांनी व्यक्त केले. 

बातम्या आणखी आहेत...