आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूतन झापर्डे, वैष्ण‌‌वी थोरात शंभर टक्के गुण मिळवून अव्वल, अकोला जिल्हा : ८५.६४%

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गतवर्षीच्या तुलनेत अकोला जिल्ह्याचा एसएससी निकाल १.६२ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी या जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ८४.०२ टक्के होती. यावर्षी वाढून ती ८५.६४ वर स्थिरावली आहे. नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत त्या ७.६७ टक्क्यांनी पुढे आहेत. विशेष असे की मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयाची नूतन झापर्डे आणि स्व. ज्योती जानोळकर विद्यालयाची वैष्णवी थोरात या दोन विद्यार्थिनींनी शंभर टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त केले. 


म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये जिल्ह्यातील ११९ केंद्रांवरुन दहावीची (एसएससी) परीक्षा घेण्यात आली होती. आज, शुक्रवारी दुपारी या परीक्षेचा निकाल ऑनलाइन घोषित करण्यात आला. ४५३ शाळांच्या २८ हजार १८८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ८६ विद्यार्थी परीक्षेत प्रवीष्ठ झाले. दरम्यान प्रवीष्ठ झालेल्यांपैकी २४ हजार ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ८५.६४ आहे. 


मुला-मुलींचा स्वतंत्रपणे विचार केल्यास सातही तालुक्यांत मुलींचाच दबदबा आहे. गुणवत्तेचे मैदान गाजवण्यात त्या मुलांपेक्षा आघाडीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे मुलींची टक्केवारी सरासरी ८९.६८ वर स्थिरावली असून मुलांची टक्केवारी ८२.०१ टक्क्यांवरच थांबली आहे. अशाप्रकारे मुलांच्या तुलनेत मुलींनी ७.६७ टक्क्यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळेच अव्वल येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्येही मुलीच आहेत. 


उत्तीर्ण झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा खरा निकाल आठवडाभरानंतर प्राप्त होणार असून त्यांच्या गुणपत्रिका शाळांमध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून आधी ऑनलाइन निकाल घोषित करायचा आणि त्यानंतर आठवडाभराने शाळांमार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका वितरित करायच्या असा क्रम म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्वीकारला आहे. 


जिल्ह्यात पातूर तालुका अव्वल 
जिल्ह्याच्या सातही तालुक्यांमध्ये पातूर तालुका अव्वल ठरला आहे. या तालुक्याचा निकाल ९०.१० टक्के आहे. त्याखालोखाल ८९.४० टक्के निकाल देणारा बार्शिटाकळी तालुका दुसऱ्या स्थानावर असून ८८.०५ टक्के निकालाचा मूर्तिजापूर तालुका तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमात ८६.५७ टक्के निकालाचा बाळापूर तालुका चौथ्या, ८५.०२ टक्केवाला अकोला तालुका पाचव्या, ८२.५४ टक्केवाला तेल्हारा सहाव्या तर ८२.२५ टक्केवाला अकोट सातव्या स्थानावर आहे. 


१७ जुलैपासून पुरवणी परीक्षा
म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूत्रांनुसार अनुत्तीर्ण ‌‌विद्यार्थ्यांना लगेच परीक्षा अर्ज दाखल करावयाचा असून त्यांची पुरवणी परीक्षा १७ जुलैपासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून गेल्या दोन वर्षापासून दहावी-बारावीचा निकाल घोषित झाला की लगेच पुरवणी परीक्षा घेतली जाते. शिवाय या परीक्षेचा निकालही लगेच घोषित केला जातो. 


छायाप्रत, गुणपडताळणीचीही सोय
गुणदान योग्य झाले नाही, अशी शंका असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांची छायाप्रत प्राप्त करण्याची सोय आहे. त्यासाठी प्रति विषय ४०० रुपये आकारले जाणार असून संबंधितांनी ९ ते २८ जूनच्या आत ऑनलाइन अर्ज दाखल करावा, असे कळवण्यात आले आहे. दरम्यान गुणपडताळणीचे अर्ज ९ ते १८ जूनदरम्यान स्वीकारले जाणार असल्याचे मंडळाने कळवले आहे. 

बातम्या आणखी आहेत...