आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: जिल्ह्यात गारपिटीचा हजारो शेतकऱ्यांना जबर फटका; मदत मिळणार फक्त 700 जणांनाच !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीटमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना जबर फटका बसला असला तरी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या फक्त ७०० च्या आसपास असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रशासकीय अहवालानुसार केवळ १७०० हेक्टर शेतजमिनीतील पिके नष्ट झाली आहेत.

 

त्यामुळे शासनाकडे सव्वा दोन कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली जाणार आहे. गारपीटमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करुन त्याबाबतचा अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले होते. या पार्श्वभूमीवर दोन दिवस विलंबाने कृषी विभागाने आपला अहवाल सादर केला. त्यानुसार पातूर आणि अकोट या दोन तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, या दोन तालुक्यांचे एकत्रित क्षेत्र १२०० हेक्टरच्या आसपास आहे.

 

या अहवालानुसार जिल्ह्यात रब्बीची पेरणी झालेले क्षेत्र ८२ हजार हेक्टर आहे. त्यातील बहुतेक शेतजमीनीला गारपीटीचा फटका बसला. मात्र ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिके गमावलेल्यांनाच सानुग्रह अनुदान दिले जात असल्याने यंत्रणेने अशाच क्षेत्राची माहिती जिल्हा प्रशासनाकडे पाठवली आहे. प्रशासकीय अहवालात दडलेल्या माहितीनुसार अकोटचे ६८३.४६ हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याच्या यादीत मोडत असून बाळापूर तालुक्यातील ४१७.३७ हेक्टर क्षेत्रातील पिकांना गारपीटचा जबर फटका बसला आहे. या श्रृंखलेत अकोला तालुक्यातील केवळ २० हेक्टर शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून तेल्हारा येथील क्षेत्र अगदीच नगण्य आहे.


पातूरचा गुंता उशीरापर्यंत कायम: पातूर तालुक्यातील नेमक्या किती क्षेत्रात नुकसान झाले, हा गुंता उशीरा सायंकाळपर्यंत कायम होता. बागायती आणि जिरायती क्षेत्राची नेमकी माहिती मिळविण्यात नैसर्गिक आपत्ती विभाग व्यग्र होता.

 

मदत ६८०० रुपये प्रतिहेक्टरपासून
तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किमान ६८०० रुपये प्रतिहेक्टर मदत दिली जाणार आहे. अर्थात ज्यांची शेती जिरायती प्रकारात मोडते, त्यांना या दराने मदत दिली जाईल. याशिवाय बागायती शेतीला (गहू, कांदा, मिरची इत्यादी) १३ हजार ५०० रुपये तर फळपिकांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर या दराने मदत दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...