आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोपटखेड प्रकल्पात महापालिकेला पाण्याचे आरक्षण करण्याची संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कोट्यवधी रुपये खर्च करुन अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे सबलीकरण सुरु आहे. योजनेचे सबलीकरणही केले जाईल. तरी भविष्यात लागणारे पाणी आणण्याचे नियोजन मात्र महापालिकेने केलेले नाही. जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती लक्षात घेता, काटेपूर्णा एवढा प्रकल्प उभारणे आता शक्य नाही. वान प्रकल्पात महापालिकेसाठी ९ दलघमी पाण्याचे आरक्षण केले आहे. मात्र या आरक्षणास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, महापालिकेला पोपटखेड प्रकल्पात शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी आरक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा लोकप्रतिनिधी, महापालिकेतील नेते, प्रशासन सोने करतात का? यावरच सर्व अवलंबून आहे. 


२०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ५ लाख ३५ हजार आहे. साधारणपणे दहा वर्षात लोकसंख्येत १ लाख अथवा त्यापेक्षा अधिक वाढ होते. तूर्तास २०१८ सुरु आहे. यानुसार लोकसंख्या ६.५० हजाराच्या घरात पोेहोचली आहे. रेल्वे स्थानक, बाजारपेठ, रुग्णालये आदींमुळे ५० हजार लोकसंख्येचा अतिरिक्त भार येतो. त्यामुळेच खऱ्या अर्थाने महापालिकेला ७ लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करावा लागतो. लोकसंख्येत वाढ होत असली तरी काटेपूर्णा प्रकल्पातील शहराच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ करता येत नाही. महापालिकेची झालेली हद्दवाढ, पुढील १० ते १५ वर्षात वाढणारी लोकसंख्या आणि भूमिगत गटार योजना कार्यान्वित झाल्या नंतर शहराला वर्षाकाठी किती पाणी लागेल? याचा अभ्यास अद्याप झालेला नाही. शहर विकासासाठी डिपीआर तयार केला जातो. मात्र पाणी पुरवठ्या बाबतचा िडपीआर दुर्देवाने केला जात नाही. 


काटेपूर्णा प्रकल्पात शहरासाठी २४ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. यापैकी तूर्तास २० दलघमी पेक्षा अधिक पाण्याची उचल केली जात आहे. हद्दवाढ भागात जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्या नंतर काटेपूर्णा प्रकल्प शहराला पाणी पुरवठा करण्यास अपुरा पडणार आहे. त्यामुळेच अमृत योजनेत जलवाहिन्या अंथरल्या, बदलल्या जलकुंभ बांधले तरी नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी आणणार कोठून? हा प्रश्न मात्र कायम आहे. 


भविष्यात गरज भासणार ३८ द.ल.घ.मी. पाण्याची 
पुढील दहा ते पंधरा वर्षात वाढणारी लोकसंख्या तसेच भूमिगत गटार योजना कार्यान्वित झाल्यास दरडोई, दरदिवशी १५० लिटर पाणी पुरवठा करावा लागणार आहे. ७ लाख लोकसंख्येचा विचार केला तरी महिन्याकाठी ३.१५ दलघमी तर वर्षाकाठी ३७.८ दलघमी पाण्याची गरज भासणार आहे. हे अधिक लागणारे पाणी पोपटखेड प्रकल्पातून मिळणे शक्य आहे.

 
काटेपूर्णातील पाणी अपुरे पडणार 
महापालिकेला खऱ्या अर्थाने ७ लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करावा लागतो. दरडोई दरदिवशी १०० लिटर पाणी पुरवठा केल्यास महिन्याकाठी २.१० तर वर्षाकाठी २५ दलघमी पाण्याची गरज भासणार आहे. काटेपूर्णात आरक्षण २४ दलघमीचे आहे. त्याच बरोबर दर दोन ते तीन वर्षानी पावसाच्या लहरीपणामुळे काटेपूर्णा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे आरक्षित २४ पेक्षा कमी पाणी मिळाल्यास काटेपूर्णा प्रकल्पातील पाणी अपुरे पडणार आहे. 


पोपटखेड प्रकल्पात पाणी 
अकोट तालुक्यात पोपटखेड धरणाचे विस्तारीकरण झाले. पूर्वी या प्रकल्पाची साठवण क्षमता १०.८४ दलघमी होते. आता विस्तारीकरणाने ८.२४ दलघमीने वाढ झाली. त्यामुळे पोपटखेड प्रकल्पाची साठवण क्षमता १९.८ दलघमी झाली. या प्रकल्पातून सिंचन, गावांना पाणी पुरवठ्यासाठी पाणी आरक्षित केले. त्यामुळेच भविष्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी मनपाला पोपटखेड प्रकल्पात १० ते १५ दलघमी पाणी आरक्षणाची संधी आहे. 


यापूर्वी एक संधी गमावली 
शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेल्या दगड पारवा प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षण करण्याची संधी महापालिकेला मिळाली होती. पाणी आरक्षितही करण्यात आले होते.मात्र आरक्षित पाण्याच्या शुल्काचा भरणा महापालिकेने न केल्याने पाटबंधारे विभागाने या पाण्यातून सिंचन घेण्याचा निर्णय घेतला. 


वान प्रकल्पातून पाणी आरक्षणाला विरोध 
दरम्यान नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पाणी आरक्षणाच्या बैठकीत वान प्रकल्पातील ९ दलघमी पाणी शहरासाठी आरक्षित केले होते. मात्र वान प्रकल्पातील या आरक्षणाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्याच बरोबर वान ते अकोला अशी मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...