आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसची तोडफोड, शेतकऱ्यांचा रास्ता रोको, शेकडो कार्यकर्त्यांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट प्रती लिटर पाच रुपये अनुदान जमा करण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १६ जुलैपासून दूध बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. 

 

दरम्यान, आज १९ जुलै चौथ्या दिवशीही या आंदोलनाची धग कायमच होती. तालुक्यातील वरवंड येथे कार्यकर्त्यांनी एस. टी. बस फोडली, तर चिखली, मलकापूर, पेठ, देऊळगावमही, डोणगाव, भादोला, संग्रामपूर, मेहकर, दुसरबिड येथे रस्तारोको करण्यात आला. डोणगाव येथे गाढवाला दुधाने अंघोळ घालून शासनाचा निषेध करण्यात आला, तर मेहकर येथे मुख्यमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. 


दरम्यान पोलिसांनी सकाळपासून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करून शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तर अनेक कार्यकर्ते रात्रीपासून भूमिगत झाले आहेत. बुधवारी रात्री वरवंड फाट्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा नागपूर ही बस अडवून बसेसच्या काचा फोडल्या. या वेळी कोणत्याही प्रवाशांना इजा झाली नाही. तर आज सकाळी राणा चंद्रशेखर चंदन यांच्या नेतृत्वात भादोला येथे रस्त्यावर जनावरे उभे करून रास्तारोको करण्यात आला. दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी जाऊन राणा चंदन, शे. रफिक, ज्ञानेश्वर कल्याणकर, कडूबा मोरे व महेंद्र जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 


पेठ फाट्यावर रास्ता रोको
चिखली येथील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पेठ फाट्यावर घोषणाबाजी करत एक तास रास्तारोको केला. या रास्ता रोको आंदोलनामुळे चिखली खामगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला आहे. या वेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्वाभिमानीचे भारत वाघमारे, राणा संजय इंगळे, भगवान म्हस्के, राम अंभोरे, संतोष खडसे, संतोष शेळके याांना ताब्यात घेतले. तर भगवानराव मोरे, नितीन राजपूत यांना रात्री दीड वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चिखली जाफ्राबाद रोडवर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गायी म्हशी आणून रस्तारोको केला. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. मयूर बोर्डे, प्रेमसिंग धनावत, योगेश पायघन, अनिल वाकोडे, संतोष परिहार, रामेश्वर परिहार, कैलास राऊत, भगतसिंग लोदवाळ, सुनील ज्ञावने यांच्यासह ३० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 


देऊळगाव मही येथे स्वाभिमानीचा रास्ता रोको 
देऊळगावमही येथे बबनराव चेके यांच्या नेतृत्वात चिखल ते देऊळगावराजा मार्गावर रास्तारोको करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला. जवळपास अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

बातम्या आणखी आहेत...