आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला-मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रातून पुनर्वसित केलेल्या अकोट व तेल्हारा तालुक्यातील आठ गावांमध्ये युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंह यांनी गुरुवारी यंत्रणेला दिले. या गावांमधील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी दुपारी आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले.
अकोट तालुक्यातील सोमठाणा बजुर्ग, केलपाणी बुजुर्ग, केलपाणी खुर्द, गुल्लरघाट, अमोना व धारगड आणि तेल्हारा तालुक्यातील नागरतास व बारूखेडा ही गावे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रातून पुनर्वसित करण्यात आली आहेत. पुनर्वसन केलेल्या ठिकाणी संबंधितांना कोणतीही उणीव जाणवू नये म्हणून िवविध विकासकामांसाठी प्रशासनाने १० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. या रकमेतून करावयाची कामे युद्धपातळीवर पुढे न्यावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.
पुनर्वसित गावांमध्ये कोणत्याही मुलभूत सोई उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत, त्यामुळे संबंधित गावांमधील आदिवासींनी गेल्या दोन महिन्यांपासून वेळोवेळी आंदोलने केली आहेत. काही गावे अमरावती जिल्ह्यातील असल्यामुळे हा प्रश्न मिटवण्यासाठी सध्या दोन्ही जिल्ह्यांचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नरत आहेत. या मुद्द्याची दखल थेट सीएम कार्यालयाने घेतली असल्याने बैठकीपूर्वी आयुक्तांनी स्वत: त्या गावांचा दौरा केला. बैठकीला जिल्हाधिकारी, सीईओ, अकोटचे उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, उपमुख्य कार्य.अधिकारी डॉ. पवार, उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अकोटचे एसडीओ राजपूत, साबांविचे मिथिलेष चव्हाण, अकोटचे तहसीलदार घुगे, तेल्हाराचे डॉ. येवलीकर आदी उपस्थित होते.
युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे दिले आदेश
पुनर्वसित गावांमधील उपाययोजनेसाठी आयोजित बैठकीत आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व इतर अधिकारी. जिल्हा परिषदेचे सहकार्य घ्या पुनर्वसित गावांमध्ये पेयजलही समस्या आहे. त्यासाठी उपाययोजना करताना काही बाबी कायदेशीर चौकटीत बसवता येत नाहीत. त्यामुळे विशेष बाब म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षांची तातडीने मान्यता घेण्याबाबतची सूचनाही पीयूष सिंह यांनी केली. पाणीपुरवठ्याची कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
अंगणवाडी, शाळा इमारतींवर भर
पुनर्वसित गावांमध्ये ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम त्वरेने करण्याचे निर्देश देत असतानाच अंगणवाडी आणि शाळांच्या इमारतींकडेही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. कामकाजाच्यादृष्टीने ही बाब अत्यावश्यक आहे, त्यासाठी सर्व यंत्रणांनी एक-दुसऱ्याला पुरक कामे करावीत,असेही त्यांनी सूचित केले.
असे दिले निर्देश
ग्रामस्थांना मनरेगाची कामे, वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार, रेशनकार्ड शिबिरे आयोजित करावीत. अंगणवाडी, ग्रामपंचायत, शाळांच्या इमारतींची कामे पूर्ण करावीत. घरकुलसह स्मशानभूमीची कामे, ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिर घेण्याचे निर्देश दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.