आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वीच्या वर्गावर चौथीचे शिक्षक, मनपा शाळेतील वास्‍तव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिका शाळा क्रमांक २६ मध्ये नववा वर्ग सुरु होऊन चार वर्षे तर दहावा वर्ग सुरु होऊन तीन वर्षेपूर्ण झाले आहेत. मात्र महापालिकेच्या उदासिन धोरणामुळे अद्यापही या शाळेला माध्यमिक शिक्षक न दिल्याने, प्राथमिक शाळेतील शिक्षकच माध्यमिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. या प्रकारामुळे महापालिकेने केवळ नववा, दहावा वर्ग सुरु करण्या पलीकडे काहीही न केल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांची अवस्था इलाही जमादार यांच्या 'हे असे बागेवरी उपकार केले, पाडूनी भिंती घराच्या दार केले' या कवितेसारखी झाली आहे.

 

महापालिका शाळांमध्ये इयत्ता आठवी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. मात्र महापालिका शाळांची झालेली खस्ता हालत, खालावलेली शैक्षणिक पातळी आणि पालकांमध्ये निर्माण झालेली जागरुकता, यामुळे महापालिकांच्या शाळा ओस पडून आहेत. त्यामुळे च महापालिका शाळांची संख्या १८ वर्षात ५५ वरुन ३३ वर आली आहे. तर दुसरीकडे अनेक शाळांमध्ये सातवी पर्यंतच शिक्षणाची व्यवस्था आहे. मात्र महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ यास अपवाद ठरली होती. माजी नगरसेवक दिलीप देशमुख यांनी शाळेकडे विशेष लक्ष दिले. एवढेच नव्हे तर शिवसेना वसाहतीतील महापालिकेच्या शाळेत आठवी नंतर शिक्षणाची व्यवस्था नसल्याने या भागातील विद्यार्थी पुढे शिकत नाहीत, ही बाब लक्षात आल्या नंतर त्यांनी अथक प्रयत्न केले. शिक्षण उपसंचालकांचे उंबरठे झिजवून महापालिका शाळा क्रमांक २६ मध्ये २०१४-२०१५ ला नववा वर्गाची मंजुरी आणली. महापालिका प्रशासनानेही यासाठी मदत केली. त्यामुळेच २०१५-२०१६ ला या शाळेतील विद्यार्थ्यानी प्रथमच दहावीची परिक्षा दिली. या वर्षी या शाळेतील तिसरी बॅच दहावीची परिक्षा देत आहे. त्यामुळेच महापालिका क्षेत्रात दहावी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था असलेली ही महापालिकेची एकमेव शाळा ठरली.

 

महापालिका शाळेत नववी, दहावीचा वर्ग सुरु झाल्या नंतर ही शाळा खऱ्या अर्थाने माध्यमिक शाळा झाली. परिणामी माध्यमिक शाळे प्रमाणेच या शाळेतही माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करणे क्रमप्राप्त होते. मात्र तीन वर्ष लोटूनही महापालिकेने अद्यापही माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केलेली नाही. कायम आस्थापनेवर नियुक्ती करणे अशक्य असले तरी किमान मानसेवी तत्वावर माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करणे शक्य होते. मात्र शिक्षणाबाबत उदासिन असलेल्या महापालिकेने तीन वर्ष लोटले असताना महापालिका या शाळेवर माध्यमिक शिक्षक केव्हा नियुक्त करणार? असा प्रश्न आता पालकांनी उपस्थित केला आहे.

 

अडीच महिन्यात व्यवस्था करणे शक्य
या शाळेतील चौथी बॅच दहावीत प्रवेश करीत आहे. एप्रिलच्या मध्यापासून शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागतील. जुन महिन्यात शाळा सुरु होणार असल्या तरी दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात देखील सरावासाठी बोलावले जाते. महापालिकेने मानसेवी तत्वावर नववी, दहावीसाठी माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया राबवल्यास पुढच्या बॅचला शाळा सुरु झाल्यावर मार्गदर्शन मिळणे शक्य आहे. नियुक्ती प्रक्रिया, त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, आता पासून ही प्रक्रिया महापालिकेने राबवणे गरजेचे आहे, असे मत माजी नगरसेवक दिलीप देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

 

खासगी शैक्षणिक संस्थांचे योगदान
महापालिकेच्या या शाळेतील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना दिव्य मराठी, प्रभात किडस्, मायबोली कोचिंग क्लासेस यांच्यातर्फे तीन वर्षापासून 'मिशन २६' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमात श्री रेणुका माता मित्र मंडळ, रेडक्रॉस सोसायटीसह विविध सामाजिक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते जुळले आहे. या माध्यमातून ग्रॅज्युएट पर्यंत तीन विद्यार्थ्यानीचे पालकत्वही स्विकारण्यात आले आहे. एकीकडे खासगी संस्था शाळेला सलग तीन वर्षापासून मदत करीत असताना, महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकारी मात्र हातावर हात धरुन बसले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...